इंधन दरवाढीविरोधात नंदुरबारात काँग्रेसतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:33 PM2018-05-25T12:33:48+5:302018-05-25T12:33:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सायकल रॅली, बैलगाडीवर दुचाकी ठेवून आणि शासनाच्या निषेधाच्या विविध घोषणा देत काँग्रेसतर्फे गुरुवारी ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढण्यात आला. त्या त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबारात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. आमदार रघुवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी सायकल चालवत शहरातील विविध भागातून तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात आला. यावेळी बैलगाडीवर दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात पेट्रोल व डिङोलचे दर शंभरी गाठू पहात आहेत. वाढलेल्या इंधन दरामुळे महागाई देखील वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका विविध घटकांवर होत आहे. केंद्र व राज्य शासन इंधन दरवाढ रोखण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. यापुढेही तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव मोरे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वसावे, पालिका सभापती कैलास पाटील, नंदुरबार विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, नगरसेवक दिपक दिघे, परवेजखान यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तळोद्यात निवेदन
तळोद्यात सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा यांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, नगरसेवक संजय माळी, सुभाष चौधरी, गौरव वाणी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, जितेंद्र माळी, संदीप परदेशी, प्रकाश ठाकरे, पंकज राणे, बापू कलाल, रईस अली, अरविंद मगरे, योगेश पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते.