कडक कांझीच्या कपड्यांवर उडाले चिखलाचे पाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:51+5:302021-09-21T04:33:51+5:30
नेत्यांचे दौरे आणि कार्यकर्त्यांची लगबग हे समीकरणच असते. परंतु या लगबगीत एका कार्यकर्त्याचा झालेला मुडहाफ एक विनोदाचा विषय ठरला ...
नेत्यांचे दौरे आणि कार्यकर्त्यांची लगबग हे समीकरणच असते. परंतु या लगबगीत एका कार्यकर्त्याचा झालेला मुडहाफ एक विनोदाचा विषय ठरला होता. त्याचे असे झाले, नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ नेते मंडळी आली होती. त्यांच्या आगत-स्वागतासाठी जिल्हाभरातून कार्यकर्ते शहादा येथे रवाना झाले होते. आपण सर्वात पुढे अशी प्रत्येकाची धडपड होती. एका नेत्याने कार्यकर्त्यांचा छोटेखानी मेळावा घेतला तर एका नेत्याने पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नेते आले म्हणजे पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमात असतात. अशाच एका पक्षाच्या कार्यकर्त्याने कांझीचा कडक ड्रेस घालून शहादा गाठले. त्यासाठी दोन दिवस आधीपासून तयारी सुरू होती. कार्यकर्ते एका वाहनाने संबंधित ठिकाणी पोहोचले. जातांना रस्ता ओलांडावा लागला. त्या परिसरात पाऊस झालेला असल्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी साचले होते. कार्यकर्ता रस्ता ओलांडत असतांनाच एक दुचाकीस्वार भरधाव आला आणि खड्ड्यांतील चिखलाचे पाणी उडवून गेला. ते कार्यकर्त्याच्या कांझीच्या कडक व पांढऱ्या ड्रेसवर खालूनपासून वरपर्यंत पाणी उडाले. पांढरा ड्रेस चिखलाने माखला. ऐनवेळी आणि नेत्याच्या भेटण्याच्या अवघ्या काही मिनिटांच्या आधी कार्यकर्त्यावर ही वेळ आल्याने त्याचा संताप झाला. तोपर्यंत दुचाकीस्वार तेथून दिसेनासा झाला. संताप व्यक्त करीत, स्वत:च्या नशिबाला दोष देत कार्यकर्ता गपगुमान एका टपरीवर जाऊन बसला. तेथून आतल्या कार्यक्रमाचे भाषण, टाळ्या, घोषणा ऐकू येत होत्या तो तो कार्यकर्त्याचा संताप अनावर होऊन स्वत:ला दोष देत बसत होता...-मनोज शेलार