शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:45 PM2020-11-24T13:45:20+5:302020-11-24T13:45:27+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  रस्त्याच्या मधोमध वाहने व लाँरी उभी करून व्यवसाय करणारे फेरीवाले विरोधात तसेच तात्पुरते अतिक्रमण ...

Municipal hammer on encroachments in martyrdom | शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  रस्त्याच्या मधोमध वाहने व लाँरी उभी करून व्यवसाय करणारे फेरीवाले विरोधात तसेच तात्पुरते अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण सोमवारी पालिका व पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेत काढण्यात आले. दिवसभरात दोन टप्प्यात झालेल्या कारवाईत सुमारे १०० पेक्षा अधिक अतिक्रमणधारकांची अतिक्रमणे प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली. दरम्यान, शहरात मंगळवारी बाजार भरत असल्याने मोहीम तात्पुरती एक दिवस बंद राहील. परंतु बुधवारपासून पुन्हा अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पालिका मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांनी सांगितले.
परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम.रमेश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात फेरफटका मारून शहराची परिस्थिती जाणून घेतली. यात प्रामुख्याने वाहतुकीच्या कोंडीसाठी फेरीवाले व अतिक्रमणधारक जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी चर्चा करून पोलीस व पालिका प्रशासनाद्वारे संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमण काढण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे फेरीवाल्यांना व्यवसायासाठी प्रेस मारुती मैदानावर जागा देण्याचा निर्णय घेतला आला आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता परीविक्षाधीन पोलीस अधिक्षक एम.रमेश, पािलका मुख्याधिकारी राहुल वाघ व पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस तथा दंगा नियंत्रण पथक व पोलीस कर्मचारी यांनी नगरपालिका कार्यालयापासून मोहिमेला सुरुवात केली. मुख्य रस्ता, भाजी मंडई, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, बसस्थानक परिसर, दोंडाईचा रोड, विश्रामगृह परिसर, पंचायत समिती कार्यालय परिसर आदी महत्त्वाच्या ठिकाणची अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहन रिक्षाद्वारे शहरात सकाळपासून केले जात होते. जे अतिक्रमणधारक स्वतःहून काढतील त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र ज्यांनी अतिक्रमण काढले नाही अशांच्या विरोधात पालिकेने  जेसीबीचा वापर करून अतिक्रमण काढले. दिवसभरात दोन टप्प्यात चाललेल्या या कारवाईत १०० पेक्षा अधिक तात्पुरती अतिक्रमणे काढण्यात आली. यात रस्त्याच्या मधोमध असलेल्या टपऱ्या, फेरीवाले यांचा समावेश आहे तर ज्यांनी पत्र्याचे शेड व पायऱ्या बांधून अतिक्रमण केले त्यांचे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
शहरात २०० पेक्षा अधिक फेरीवाले व्यवसाय करतात. या फेरीवाल्यांची कुठेही अधिकृत नोंद नाही. मात्र सर्रासपणे वर्दळीच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध लॉरी लावून व्यवसाय करतात व वाहतुकीची कोंडी करतात. अशांंवर सोमवारी कारवाई करण्यात आली. फेरीवाल्यांना व्यवसायासाठी प्रेस मारूती मैदानावर पालिका प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली असून त्यांनी तेथेच व्यवसाय करावा. मंगळवारपासून ते पुन्हा रस्त्यावर आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
वाहनधारक मनात येईल त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने लावून वाहतूक अडवतात. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाने मुख्य रस्ता व दोंडाईचा रस्त्यावर दोन्ही बाजूला मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था केलेली आहे.        मात्र वाहन चालकांकडून बेजबाबदारपणे वाहनांची पार्किंग करण्यात येते.         अशा वाहनचालकांवर पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली. आजच्या मोहिमेत पोलिसांच्या वाहतूक शाखेने रस्त्यांच्या मधोमध वाहने पार्किंग करणाऱ्यांविरोधात ही कारवाई केली. दररोज वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई करण्यात यावी. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे मुख्य बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्रपणे पार्किंगची व्यवस्था         करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 

Web Title: Municipal hammer on encroachments in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.