परस्पर विकली वाळू; ट्रक चालकानं केली ट्रक मालकाची फसवणूक
By शेखर पानसरे | Published: June 27, 2023 06:44 PM2023-06-27T18:44:51+5:302023-06-27T18:46:11+5:30
या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घारगाव : नंदूरबार येथून ट्रकमध्ये वाळू भरून तो ट्रक लोणावळा येथे घेऊन जाणाऱ्या चालकाने संगमनेर तालुक्यात वाळूची परस्पर विक्री करत ट्रक मालकाची फसवणूक केली. वाळूची विक्री केल्यानंतर ट्रक एका ढाब्यावर लावून चालक पळून गेला. हा प्रकार सोमवारी (दि.२६) संध्याकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुशील भाऊसाहेब थोरात (वय २५, रा.वरणवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात ट्रकमालक रविराज सुभाष रोकडे (वय ३५ वर्षे, रा. प्लॉट नं. १०७, साईनाथ नगर, निगडी, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) ट्रकमालक रोकडे यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच.४२, टी. २१०१) सरकारी वाळू भरण्यासाठी चालक थोरात याच्या ताब्यात दिला, त्याला वाळू भरण्यास नंदूरबार येथे पाठविले. ट्रकमध्ये वाळू भरून चालक थोरात हा ट्रक घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता. ट्रकमधील वाळू पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे एकाला द्यावयाची होती. मात्र, त्याने परस्पर वाळूची विक्री केली.