कोठलीत नवकूळ नागपूजा भातिजी नाम होमयज्ञ महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 01:02 PM2019-12-01T13:02:44+5:302019-12-01T13:02:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातिजी संप्रदायातर्फे प.पू. गोविंदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 वे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील कोठली येथे रविवारी भातिजी संप्रदायातर्फे प.पू. गोविंदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 वे नवकुळ नागपूजा भातिजी नामयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासाठी तयारी पूर्ण करण्यात आलेली असून कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील 20 हजार भाविक उपस्थित राहणार आहेत.
कोठली येथे दुपारी साडेतीन वाजता होमयज्ञ महोत्सवाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता आरती, साडेआठ वाजता महाप्रसाद, रात्री साडेआठ ते नऊ वाजेर्पयत भजन व गुरुवंदना कार्यक्रम होईल. रात्री नऊ ते 10 वाजेर्पयत स्वागत समारंभ, 12 वाजेर्पयत सत्संग तर रात्री 12 वाजता आरती प्रसाद व त्यानंतर रात्री एक ते पहाटे पाच वाजेर्पयत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
महोत्सवाचे प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ.हीना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, पालघराचे खासदार राजेंद्र गावीत, आमदार शिरीष नाईक, माजी आमदार शरद गावीत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत उपस्थित राहणार आहेत. भातिजी नामयज्ञ महोत्सव जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानदास महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नानसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती सरपंच वासंतीबाई वळवी, कांतीलाल पाडवी, विजय वळवी, चंद्रकांत वळवी, सतीश वळवी, बालाजी वळवी, मिथुन वळवी, दिनेश वळवी, उघडय़ा वळवी, संजय वळवी, विपुल वळवी, सुरेश वळवी, मदन वळवी, विवेकानंद वळवी यांनी दिली.
भाविक एकवटले
जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर प.पू.भातिजी महाराज संप्रदायाचे अनुयायी असून महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील साधारणत: 20 हजार भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. शनिवारी दिवसभर भाविकांकडून यज्ञ मंडपाची उभारणी करण्यात येत होती. गावातील के.डी. गावीत हायस्कूलच्या प्रांगणात भजन व कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याने त्या ठिकाणाचीही तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.
पारंपरिक आदिवासी नृत्याने महोत्सवाला रविवारी दुपारी साडेतीन वाजेपासून प्रारंभ होण्यापूर्वी गावातून संत व महात्म्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी एकलव्य गणेश मंडळ, वीर भातिजी मंडळ, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, स्वाध्याय परिवार, श्रीराम मंडळ, बालाजीवाडा ग्रुप, माऊली माता ग्रुप, युवा प्रतिष्ठान मंडळ तसेच गावातील सर्व महिला बचत गटाच्या महिला परिश्रम घेत आहेत.