Nandurbar: चौघांच्या छळाला कंटाळून बांधकाम ठेकेदार नातेवाइकानं संपवलं जीवन
By मनोज शेलार | Published: November 6, 2023 06:01 PM2023-11-06T18:01:02+5:302023-11-06T18:01:34+5:30
Nandurbar: पुलाच्या बांधकाम साइटवरील सिमेंट व लोखंड चोरी केल्याची बाब मालकाला सांगणार व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या चौघांच्या छळाला कंटाळून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
- मनोज शेलार
नंदुरबार - पुलाच्या बांधकाम साइटवरील सिमेंट व लोखंड चोरी केल्याची बाब मालकाला सांगणार व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणाऱ्या चौघांच्या छळाला कंटाळून एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याबाबत चौघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण चुडामण वाडेकर (४९) रा.शांतीनगर, धुळे असे मयताचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, महाराष्ट्र-गुजरात सीमेवर धानोरानजीक रंका नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलावर चार जण हे सुपरवायझर म्हणून कामाला होते. त्यांनी कामाच्या ठिकाणावरून सिमेंट व स्टीलची चोरी केली होती. ती बाब मयत किरण वाडेकर यांनी पाहिली होती. त्यामुळे वाडेकर हे पुलाचे ठेकेदार अर्जुन वाघ यांना सांगतील अशी त्यांना भीती होती. त्यावरून त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. शिवीगाळ देखील केली जात होती. शिवाय वाडेकर यांचा व्हिडीओ देखील व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करीत होते. या मानसिक छळाला कंटाळून किरण वाडेकर यांनी रविवारी पुलाच्या कडीला दोराने गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत विकास सुधाकर सोनवणे, रा.धुळे यांनी फिर्याद दिल्याने प्रकाश धुडकू सदाशिव (३५) रा.धुळे, भैया कोळी उर्फ भैया महाराज (३५) रा.धानोरा, पिंटू नामक एक व्यक्ती रा. भांगडा व राजल्या नामक व्यक्ती रा. धानोरा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अजय वसावे करीत आहे.