नंदुरबार : डमी अर्ज वगळता इतर सर्व अर्ज वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:10 PM2019-10-06T12:10:59+5:302019-10-06T12:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात डॉ.सुप्रिया गावीत यांचा डमी अर्ज बाद झाला. इतर सर्व अर्ज वैध ठरले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघात डॉ.सुप्रिया गावीत यांचा डमी अर्ज बाद झाला. इतर सर्व अर्ज वैध ठरले. काँग्रेस व भाजपच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांविरूद्धच्या हरकती फेटाळण्यात आल्या.
नंदुरबार मतदारसंघात छाननी अंती डॉ.विजयकुमार गावीत (भाजप), उदेसिंग पाडवी (काँग्रेस), आनंदा सुकलाल कोळी (अपक्ष), विश्वनाथ वळवी (अपक्ष), कुणाल वसावे (अपक्ष), दिपा वळवी (वंचीत आघाडी), विपूल रामसिंग वसावे (बसपा), अॅड.प्रकाश गांगुर्डे (स्वाभिमानी) यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. दरम्यान, डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांच्या अर्जावरील हरकती निकाली काढण्यात आल्या. आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती थवील होत्या.
ंअक्कलुकवा : पाच जणांचे अर्ज बाद
नंदुरबार : अक्कलकुवा मतदारसंघात पाच अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता 14 उमेदवार रिंगणात आहेत.
मतदारसंघात 19 जणांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत पाच जणांचे अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. बाद ठरलेल्या अर्जामध्ये नागेश दिलवरसिंग पाडवी यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला होता. परंतु ए.बी.फॉर्म नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. शंकर आमशा पाडवी यांनी शिवसेनेतर्फे अर्ज भरला होता. परंतु डमी असल्यामुळे बाद ठरला. याशिवाय रोता पाल्या तडवी (वंचीत बहुजन आघाडी), बिजेसिंग करमसिंग पावरा (अपक्ष), हेमलता कागडा पाडवी यांचा डमी अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आला. आता येथे आमशा पाडवी (शिवसेना), अॅड.के.सी.पाडवी (काँग्रेस), नागेश पाडवी (अपक्ष), कैलास वसावे (आप) यांच्यासह एकुण 14 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल पाटील होते.
नवापूर : चार जणांचे अर्ज बाद
नंदुरबार : नवापूर मतदारसंघात एकुण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी चार अर्ज बाद झाल्याने आता 12 उमेदवार रिंगणात आहेत.
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये रजनी नाईक यांनी काँग्रेसचा डमी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. याशिवाय अपक्ष उमेदवार माधवराव काशिराम पाडवी, प्रदीपकुमार गावीत, रामा तिज्या गावीत यांचे अर्ज विविध कारणांनी बाद ठरविण्यात आले. आता रिंगणात भरत गावीत (भाजप), शिरिषकुमार नाईक (काँग्रेस), जगन गावीत (वंचीत आघाडी), सुनील गावीत (आप), रामू वळवी (पिपल्स पार्टी) यांच्यासह एकुण 12 उमेदवार रिंगणात आहेत.
येथे कुणीही हरकत न घेतल्याने छाननीची प्रक्रिया लागलीच झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश शेलार होते.
शहादा : एक अर्ज बाद
शहादा : शहादा-तळोदा विधानसभा मतदार संघात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरविण्यात आला. सहा उमेदवार आता रिंगणात आहेत. उमेदवारीबाबत कोणीही हरकत घेतली नसल्याने शांततेत उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली.
परिपुर्ण अर्ज भरला नसल्यामुळे अपक्ष उमेदवार सिमा वळवी यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. छाननी अंती अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये पद्माकर वळवी (काँग्रेस), राजेश पाडवी (भाजप), जयसिंग माळी (भाकप), ङोलसिंग पावरा (अपक्ष), सचिन कोळी (अपक्ष), मोहनसिंग शेवाळे (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चेतन गिरासे होते.