नंदुरबारसह नवापूर व तळोद्याचे नगराध्यक्ष 23 रोजी होतील विराजमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:43 AM2017-12-21T11:43:46+5:302017-12-21T11:44:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह नवापूर व तळोदा पालिकांचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष हे 23 डिसेंबर रोजी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे. विद्यमान सदस्यांची मुदत 23 डिसेंबर रोजी संपणार आहे. दरम्यान, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे येत्या दोन दिवसात राजपत्रात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
विद्यमान नगराध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांची मुदत 23 डिसेंबर्पयत आहे. त्याआधीच निवडणुका होऊन नवीन सदस्य निवडून येवून त्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक असते. त्यानुसार 18 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. त्याच दिवशी दुपारी निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार 21 किंवा 22 रोजी राजपत्रात नावे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लागलीच नवीन सदस्य पदभार स्विकारणार आहेत.
सदस्यसंख्या वाढली
विद्यमान पालिका सदस्यांपेक्षा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची संख्या वाढली आहे. नंदुरबारात 37 सदस्यसंख्या होती ती आता 39 झाली आहे. नवापुरात 18 सदस्यसंख्या होती ती 20 झाली आहे तर तळोद्यात 17 सदस्यसंख्या होती तेथे 18 झाली आहे. याशिवाय थेट जनतेतून नगराध्यक्ष देखील निवडण्यात आले आहेत.
23 रोजी पदभार
यापूर्वी प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्षांची निवड केली जात होती. त्यामुळे मुदतीच्या आत विशेष सभा घेवून नगराध्यक्षांची निवड करणे आवश्यक राहत होते. आता मात्र थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाल्याने आता केवळ नवीन नगराध्यक्ष हे पदभार स्विकारणार आहेत.
साधारणत: 23 डिसेंबर रोजी नवीन नगराध्यक्ष पदभार स्विकारतील असा अंदाज वर्तविला जात आहे. 24 रोजी रविवार असल्याने आणि 25 रोजी नाताळची सुटी असल्यामुळे 23 रोजीच पदभार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होण्याची प्रतिक्षा लागून आहे.
उपनगराध्यक्ष व विविध समिती
नगराध्यक्षांनी पदभार स्विकारल्यानंतर लागलीच उपनगराध्यक्ष व विविध समितींचे सदस्यांची निवड प्रक्रिया होणार आहे. साधारणत: 30 डिसेंबर रोजी उपनगराध्यक्ष आणि विविध विषय समितींच्या सभापती व सदस्यांची निवड होण्याची शक्यता आहे. नुतन नगराध्यक्ष हे याबाबतच्या प्रक्रियेची घोषणा करतील. नगराध्यक्ष पदभार स्विकारण्यासाठी पीठासीन अधिका:यांची गरज राहणार नाही. उपनगराध्यक्ष व विषय समिती निवडीसाठी मात्र पीठासीन अधिका:यांची नेमणूक करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
उपगराध्यक्षपदी कुणाची वर्णी
उपनगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते याकडे तिन्ही ठिकाणच्या सदस्यांचे लक्ष लागून आहे. नंदुरबारात प्रत्येकी एका वर्षासाठी उपनगराध्यक्षपद दिले जाते. त्यातही विविध समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचा प्रय} असतो. त्यानुसार पहिल्या वर्षी कुठल्या समाजाला प्रतिनिधीत्व मिळते याकडे लक्ष लागून आहे.
सभापतीपदाकडेही लक्ष
पालिकांमध्ये विविध विषय समिती सभापतींची देखील निवड होणार असल्याने सभापतीपदी कुणाची निवड होते याकडेही लक्ष लागून आहे. स्थायी समिती, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता, बांधकाम, अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समिती असून त्यावर सभापती आणि आठ ते दहा सदस्य यांची नियुक्ती केली जाते.
नवीन नगराध्यक्ष आणि सदस्यांच्या स्वागताच्या दृष्टीने त्या त्या नगरपालिकांमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय स्तरावर देखील तयारी सुरू आहे.