नंदुरबारच्या बाबा गणपतीला आता 11 लाखांचा नवीन रथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:51 PM2018-08-20T13:51:06+5:302018-08-20T20:02:49+5:30
नंदुरबार : सव्वाशे वर्षाची परंपरा असलेल्या येथील बाबा गणपतीचा यंदा नवीन रथ राहणार आहे. खास कर्नाटकहून 11 लाख रुपये खर्च करून हा रथ तयार करण्यात आला आहे. रथ नंदुरबारात दाखल झाला असून त्यात अनेक नवीन अत्याधुनिक सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.
नंदुरबारात दादा व बाबा हे दोन मानाचे गणपती आहेत. गणेश विसजर्न मिरवणुकीत या दोन्ही गणपतींना अग्रभागी राहण्याचा मान असतो. गणेशोत्सवासह वर्षभर या दोन्ही गणपतींच्या ठिकाणी नवस करण्यासाठी व दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी असते. त्यापैकी जळका बाजारातील बाबा गणपतीला देखील दादा गणपतीप्रमाणेच सव्वाशे वर्षापेक्षा अधीक वर्षाची परंपरा आहे. या गणपतीचा रथालाही तेवढीच वर्ष झाल्यामुळे रथ जिर्ण झाला होता. गेल्यावर्षी त्याचा एक भाग निखळला होता. त्यामुळे मंडळाने व भाविकांनी रथ नव्याने तयार करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार निधीही गोळा तयार केला होता.
नवीन प्रकारचा आणि आकर्षक रथ कुठे आणि कसा मिळेल यासाठी मंडळाच्या पदाधिका:यांनी ठिकठिकाणी माहिती घेतली. कर्नाटकातील सिरसी येथे अशा प्रकारचे रथ तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर तेथे मंडळाचे पदाधिकारी पोहचले. तेथे रथाची सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर त्यांनाच रथ बनविण्याची ऑर्डर देण्यात आली.
फोल्डींग करता येणारा
या नवीन रथाला फोल्डींगही करता येणार आहे. जागा नसल्यावर संपुर्णपणे खोलून हा रथ ठेवता येणार आहे. या रथाचे चाके 30 अंशात फिरणारे आहेत. त्यामुळे जागेवरूनच रथाची दिशा देखील बदलता येणार आहे. त्यासाठी चाकांची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात आली आहे. यामुळे रथ ओढण्यासाठी लागणारी शक्ती कमी होणार आहे.
आकर्षक सजावट
रथाची आकर्षक सजावट आहे. रथावर अष्टविनायक कोरण्यात आलेले आहेत. याशिवाय हनुमानाची मूर्ती, शंख, चक्र, गदा, ओम कोरण्यात आलेले आहेत. याशिवाय चार सिंह व चार हत्ती देखील आहेत. कर्नाटकी शैलीची झलक या नवीन रथावर दिसून येते.
सभासदांकडूनच निधी
मंडळाच्या सभासदांकडूनच वर्गणी गोळा करण्यात आली आहे. सर्वच सदस्यांनी सढळ हाताने वर्गणी दिल्याने नवीन रथ घेता आल्याचे पदाधिका:यांनी सांगितले. बाहेरील कुणाकडूनही एक रुपयाही वर्गणी घेतली नसल्याचे मंडळाचे पदाधिकारी सुनील सोनार यांनी सांगितले.
रथ पहाण्यासाठी गर्दी
बाबा गणपतीचा नवीन रथ पहाण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून भाविकांनी एकच गर्दी केली आहे. रथ जोडणीचे काम रविवारी दुपारी पुर्ण झाले. त्यासाठी कर्नाटकहून खास कारागिर येथे आले होते.