नंदुरबारात भाजप व काँग्रेसमध्येच पारंपरिक लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:33 PM2019-03-11T12:33:23+5:302019-03-11T12:33:27+5:30

नंदुरबार मतदारसंघ : सत्ताधारी कामाच्या बळावर जनतेपुढे जाणार, तर विरोधक गेल्या वेळच्या चुका सुधारताय

In Nandurbar, BJP and Congress will play in traditional fight | नंदुरबारात भाजप व काँग्रेसमध्येच पारंपरिक लढत रंगणार

नंदुरबारात भाजप व काँग्रेसमध्येच पारंपरिक लढत रंगणार

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पारंपरिक काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत काँग्रेसने मागील चुका सुधारत मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉ.हीना विजयकुमार गावीत यांना आव्हान उभे राहणार आहे. काँग्रेस आघाडीतर्फे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचे नाव निश्चित आहे. त्यांनी गेल्या चार महिन्यांपासून तयारीदेखील सुरू केली आहे.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील साक्री व शिरपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघाची गेल्या निवडणुकीपर्यंतची परंपरा लक्षात घेता काँग्रेसचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. परंतु गेल्या निवडणुकीत मोदी लाट आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा वैयक्तिक प्रभाव यामुळे खासदार डॉ. हीना गावीत या एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. नऊ वेळा निवडून आलेल्या माणिकराव गावीत यांना त्यांनी पराभूत केले होते. माणिकराव गावीत यांचे वय लक्षात घेता त्यांना यंदा उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित होते. त्यामुळे आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव गावीत यांचीच नावे कळविण्यात आली. त्यात आमदार अ‍ॅड.पाडवी हे उजवे ठरले.
विरोधक यावेळी आक्रमक असल्याचे दिसून येत आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची एकजूट कालच्या मोर्चात दिसून आली.
भाजप-सेना युती असली तरी भाजपला सेना कशी साथ देते यावरही खासदार डॉ.हीना गावीत यांचे गणित अवलंबून राहणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत राष्टÑवादीने अंतर्गत त्यांना साथ दिली होती. यावेळीही राष्टÑवादीच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.
दुसरीकडे काँग्रेसला यंदा चांगली अपेक्षा आहे. गेल्या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल हे धुळे मतदारसंघात अडकून पडल्याने शिरपूरमध्ये काँग्रेसला मोठा फटका सहन करावा लागला होता. यंदा आमदार पटेल हे नंदुरबार मतदारसंघात पूर्ण लक्ष घालणार आहेत. शहाद्याचे दीपक पाटील हे यंदा काँग्रेसकडे राहणार असून काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्षपद देखील त्यांना देण्यात आले आहे. अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदारसंघ स्वत: अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचाच बालेकिल्ला आहेच. परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रकृतीमुळे या निवडणुकीपासून लांब राहणार असल्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. लोकसभा मतदारसंघाचा विचार करता सहा विधानसभा मतदारसंघापैकी काँग्रेसकडे नवापूर, अक्कलकुवा, शिरपूर आणि साक्री मतदारसंघ आहे तर भाजपकडे केवळ नंदुरबार आणि तळोदा मतदारसंघ आहे. तळोद्याचे आमदार उदेसिंग पाडवी व खासदार डॉ.हीना गावीत यांचे पाच वर्षात जमू शकले नाही.
एकूणच मोदी लाटेचा काहीसा कमी झालेला प्रभाव व काँग्रेसची आक्रमकता तर दुसरीकडे पाच वर्षातील विकास कामे व संसदेतील प्रभावी कामगिरी आणि मोदींचे वलय या बळावर अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावणार आहेत.

Web Title: In Nandurbar, BJP and Congress will play in traditional fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.