नंदुरबारात बोगस ‘बी.टी.’चा यंदाही सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:50 PM2018-05-13T12:50:10+5:302018-05-13T12:50:10+5:30
तस्करी व विक्री रोखण्यासाठी उपाययोजना : शेतक:यांमधील जनजागृतीचा अभाव
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 13 : जिल्ह्यात यंदाही बोगस बी.टी. कापूस बियाण्यांचा सुळसुळाट मोठय़ा प्रमाणावर होत आहे. गुजरातमधील काही कंपन्यांनी जिल्ह्यातील दलालांना हाताशी धरून शेतक:यांच्या माथी बोगस बी.टी. बियाणे मारले जात असल्याचे चित्र आहे. म्हसावद येथे सापडलेले बोगस बी.टी. बियाणेदेखील गुजरातमधूनच आलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची तस्करी रोखण्यासाठी कृषी विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात उन्हाळी कापूस लागवडीचे क्षेत्र साधारणत: 18 ते 20 हजार हेक्टर आहे. बागायतदार शेतकरी उन्हाळी कापूस लागवड करतात. याशिवाय साधारणत: 80 हजार हेक्टर क्षेत्रावर कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड करीत असतात. जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या 35 टक्के क्षेत्र हे एकटय़ा कापूस पिकाचे आहे. त्यामुळे कापसाचे बोगस बियाणे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर खपविले जाते. गेल्यावर्षीदेखील तणरोधक बी.टी. बियाण्यांची मोठय़ा प्रमाणावर खासगी एजंटांमार्फत विक्री झाल्याने शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागला. यंदादेखील ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीतदेखील याबाबत चर्चा करण्यात आली होती.
2,153 क्विंटल बी.टी. बियाणे
जिल्ह्यातील साधारणत: एक लाख हेक्टर क्षेत्रावरील कापूस लागवडीची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दोन हजार 153 क्विंटल कापूस बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यात नंदुरबार तालुक्यात 538 क्विंटल, नवापूर तालुक्यात 452 क्विंटल, शहादा तालुक्यात 560 क्विंटल, तळोदा तालुक्यात 129 क्विंटल, अक्कलकुवा तालुक्यात 323 क्विंटल, धडगाव तालुक्यात 151 क्विंटल बी.टी. कापूस बियाण्यांचे नियोजन आहे.
ठोस उपाययोजना करावी
बोगस बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम आखण्याची गरज आहे. खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत सूचना दिल्या होत्या. कृषी विभागासह जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचीही मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु केवळ गुणवत्ता नियंत्रक पथक यंदाही नेहमीप्रमाणे स्थापन करण्यात आले आहे. ठोस कारवाईसाठी पथक नसल्याची स्थिती आहे.
तणनाशक रोधक बी.टी.कपास कार्यक्षेत्रामध्ये ग्लायफॉसेटचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. त्यामुळे माती प्रदूषण, हवा प्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत असून, मनुष्य प्राणी जीवनावर घातक परिणाम होत आहे. या ग्लायफॉसेट हे कर्करोगासाठी महत्त्वाचे कारण आहे. वरील बाब पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे उल्लंघन करणारे आहे.
तसेच तणनाशक रोधक बी.टी. कापूस लागवड केल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा उद्रेक मोठय़ा प्रमाणावर होतो. पिकाचे व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या प्रकारच्या कापसाची लागवड करणे टाळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे व खते विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने 22 निरीक्षक नेमले आहेत.
त्यात पूर्णवेळ निरीक्षक एक व अर्धवेळ 21 जणांचा समावेश आहे. पालकमंत्री आणि जिल्हाधिका:यांनी यापूर्वीच ज्या निरीक्षकांच्या क्षेत्रात बोगस बियाणे विक्री होईल त्यांना त्यासाठी जबाबदार धरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याशिवाय संबंधित विक्रेत्यांविरुद्धदेखील पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत.