जागेअभावी नंदुरबारचा मिरची बाजार संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:22 PM2018-06-22T12:22:48+5:302018-06-22T12:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहराची ओळख असलेल्या मिरची पथारींसाठी आता जागेची शोधाशोध करावी लागणार आहे. सध्या असलेल्या जागेवर रहिवास क्षेत्र वाढल्यामुळे या ठिकाणचे नागरिक मिरची पथारींना विरोध करू लागले आहेत. त्यामुळे मिरची बाजार आणि पथारी आता शहराबाहेर जाण्याची शक्यता आहे. योग्य जागा आणि आवश्यक सुविधा न मिळाल्यास नंदुरबारचा मिरची बाजार नामशेष होण्याची शक्यता आहे.
नंदुरबारची ओळख लाल मिरचीच्या माध्यमातून सर्वदूर आहे. लाखो क्विंटल मिरचीची आवक दरवर्षी होते. त्या माध्यमातून कोटय़ावधी रुपयांची उलाढाल देखील होत असते. या माध्यमातून मिरची प्रक्रिया उद्योगही नंदुरबारात मोठय़ा स्वरूपात सुरू झाले. चिली पार्क देखील त्याच अनुषंगाने येथे प्रस्तावीत आहे. परंतु मिरचीचा लिलाव, साठवणूक आणि वाळविण्यासाठीची जागाच आता उलब्ध होत नसल्यामुळे मिरची बाजारावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. येत्या काळात हा बाजार शहराबाहेर स्थलांतरीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दोंडाईचा, निझर स्पर्धेत
नंदुरबारातील मिरची बाजाराच्या स्पर्धेत आता दोंडाईचा आणि गुजरातमधील निझर बाजार समिती स्पर्धेत उतरली आहे. दोंडाईचा येथे देखील दरवर्षी हजारो क्विंटल मिरचीची आवक होते. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. निझर चे मार्केट देखील आता स्पर्धेत आहे. पूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, दोंडाईचा, साक्री, पिंपळनेर या भागासह तळोदा, निझर भागातील शेतकरी नंदुरबार बाजारात मिरची विक्रीसाठी आणत होते. परंतु दोंडाईचा आणि निझर मार्केटचा पर्याय खुला झाल्याने त्या भागातील शेतकरी आता तिकडे वळू लागले आहे. त्याचा परिणाम येथील आवकवर होऊ लागला असल्याचे चित्र आहे.
आता पुन्हा पथारींसाठी योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही तर हा उद्योग संकटात येईलच परंतु येथील मिरची आवक देखील मंदावेल अशी भिती व्यक्त केली जात आहे.
व्यापा:यांची मागणी
यासंदर्भात व्यापा:यांनी जिल्हाधिका:यांकडे पथारींसाठी जागा उ्पलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. उद्योग टिकवायचे असतील तर योग्य आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी येथील मिरची व्यापारी आणि उद्योजकांनी केली आहे.
नंदुरबारचा विस्तार मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला अनेक वसाहती तयार होत आहेत. मिरची पथारीवरील जागा मालकांनी आता त्या भागात प्लॉट पाडून त्यांची विक्री सुरू केली आहे. दवाखाने, व्यापारी प्रतिष्ठाने देखील या ठिकाणी येवू लागली आहेत. ही बाब लक्षात घेता स्थानिकांचा मिरची पथारींना विरोध वाढू लागला आहे. उन्हाळ्यात तसेच हवेचा वेग जास्त राहिल्यास मिरचीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. याशिवाय वळण रस्त्यावरील वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे वाहन चालकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नंदुरबारातील मिरची बाजार आणि येथील मिरची राज्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे. लाल मिरचीचे नंदुरबार अशी ओळख देखील आहे. मिरची हंगामात अर्थात नोव्हेंबर ते एप्रिल र्पयत शेकडो हेक्टर क्षेत्रावर लाल मिरचीचा गालिचा पसरलेला असतो. वळण रस्त्याच्या दोन्ही बाजुला हे चित्र गेल्या वर्षार्पयत दिसत होते. बाहेरगावच्या लोकांना या मिरची पथारींचे मोठे अप्रूप होते. बाजार समिती व व्यापारी जागा मालकांकडून भाडे तत्वावर ही जागा मिरची हंगामाच्या कालावधीत घेत होते. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून मिरची पथारींना अवकळा निर्माण होत आहे.नंदुरबारातील मिरची पथारी आता शहराबाहेर तसेच पाच किलोमिटरच्या आत नेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जागेची चाचपणी देखील सुरू करण्यात आली आहे. उमर्दे रस्त्याला लागूनच जागा मिळावी यासाठी बाजार समिती प्रय}शील आहे. भाडेतत्वावर ही जागा राहणार आहे. साधारणत: दीडशे ते दोनशे एकर जागेची आवश्यकता आहे. एवढी मोठी जागा एकाच ठिकाणी मिळणे दुरापस्थ आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या आवाहनाला जमीन मालक कसे प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे. मिरची पथारीसाठीची जागा योग्य ठिकाणी न मिळाल्यास येथील मिरची उद्योगावर संकट येण्याची शक्यता आहे. येथील व्यापारी मिरची हंगामात हजारो क्विंटल मिरची खरेदी करून ती पथारींवर वाळवून घेतात. त्यानंतर ती मिरची आपल्या गोदाम व कोल्डस्टोरेजमध्ये साठवतात. प्रक्रिया उद्योगासाठी ही मिरची वर्षभर वापरली जाते.
नंदुरबारात 20 ते 25 प्रक्रिया उद्योग आहे. तेथे तयार झालेली मिरची पावडर राज्यासह देशभरात विक्री केली जाते. एगमार्क आणि विशिष्ट ओळख असलेल्या येथील मिरची पावडरला मागणी देखील आहे. काही वर्ष येथील मिरची पावडर ही दुबई व आखाती देशात देखील निर्यात झाली होती. आताची परिस्थिती पाहिली तर हे उद्योग संकटात येण्याची शक्यता आहे.