नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा : दोषींवर कडक कारवाई करणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:20 PM2018-02-18T12:20:31+5:302018-02-18T12:22:24+5:30
शिक्षक भरती प्रकरणी सीईओंचा निर्वाळा
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 18 : अपंग युनिटअंतर्गत बोगस शिक्षक भरती प्रकरणी दोषींवर कारवाई होईलच. याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत बोलतांना दिली. अपेक्षेप्रमाणे या प्रकरणी सदस्य रतन पाडवी यांनी लेखी प्रश्न उपस्थि केला होता.
जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शनिवारी दुपारी अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांच्यासह सर्व विषय समिती सभापती उपस्थित होते. बैठकीत अपेक्षेप्रमाणे सध्या गाजत असलेला बोगस शिक्षक भरती प्रकरणाचा विषय निघाला. सदस्य रतन पाडवी यांनी यासंदर्भात सभागृहाला सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी केली. यासंदर्भात माहिती देतांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी सांगितले, सन 2008 ते 2011 या दरम्यान केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत अपंग युनिट चालविण्यात येत होते. ते युनिट 2011 मध्ये बंद करण्याचे शासनाचे आदेश आल्यानंतर त्यातील 594 शिक्षकांना जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांमध्ये सामावून घेण्यासंदर्भात शासनाने कळविले. त्यानुसार 594 जणांच्या याद्याही पाठविण्यात आल्या होत्या.
त्यापैकी काहींना नंदुरबार जिल्हा परिषदेत सामावून घेण्यात आले होते. परंतु टप्प्या टप्प्याने असे आदेश निघत गेले. आणि तब्बल 71 जणांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी 31 जणांची नावे यादीतही सापडले नाहीत व त्यांची कुठेच नोंद नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. उर्वरित 40 जणांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी या प्रकरणी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांनी खंबीर पाठबळ दिल्याने राज्यभर व्याप्ती असलेल्या या प्रकरणी नंदुरबारात पहिला गुन्हा दाखल करण्याचे धाडस आपण दाखविल्याचे सांगितले. याप्रकरणी जे कुण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सदस्य अभिजीत पाटील, किरसिंग वसावे व इतर सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निष्पक्षपातीपणे चौकशी करून प्रकरण तडीस नेल्यामुळे सभागृहात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न
वस्ती शाळा शिक्षक गेल्या महिनाभरापासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या उपाध्यक्ष सुहास नाईक, सदस्य किरसिंग वसावे, रतन पाडवी यांनी अधिका:यांना जाब विचारला. मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे व शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी यासंदर्भात शासनाचे निर्णय, करण्यात आलेल्या चर्चा आणि शासन स्तरावर होणारा पाठपुरावा याची माहिती दिली. परंतु सदस्यांचे समाधान झाले नाही. ठोस कार्यवाही व निर्णय काय ते सांगा असा पवित्रा सदस्यांनी घेतला.
अध्यक्षा रजनी नाईक यांनी मध्यस्थी करीत सभागृहाला ठोस आश्वासन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अखेर संबधितांशी चर्चा करून त्यांच्याबाबत सकारात्मक दृष्टीकोण ठेवण्याचे आश्वासन बिनवडे यांनी दिले.
बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभापती आत्माराम बागले, दत्तू चौरे, हिराबाई पाडवी, लताबाई पाडवी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.