नंदुरबार चकाकणार आता सौर ऊज्रेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:33 PM2018-05-26T12:33:53+5:302018-05-26T12:33:53+5:30
मनोज शेलार ।
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 26 : पथदिव्यांचे महिन्याचे 25 लाख रुपयांचे वीज बिल कमी व्हावे व्हावे व पालिकेवरील आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी पालिकेतर्फे पाच मेगाव्ॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी साक्री रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहालगतची जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारी नंदुरबार ही उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका ठरणार आहे.
नंदुरबार पालिकेचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या पाहता पथदिवे आणि इतर बाबींचे वीज बिल मोठय़ा प्रमाणावर येते. पूर्वीपेक्षा वीज बिल तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा ढासळत असल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून पालिकेने आता थेट सौर ऊज्रेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. पाच मेगाव्ॉटचा प्रकल्प साकारला जाणार आहे.
पोषक वातावरण
नंदुरबारसह परिसर हा सौर ऊज्रेला पोषक आहे. तालुक्याच्या सीमेलगतच साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे राज्यातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्यामुळे पालिकेनेदेखील सौर ऊज्रेलाच प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा प्रकारच्या प्रकल्पांची माहिती घेतली. असे प्रकल्प कितपत आणि कसे उपयोगी आहेत याची माहिती घेतली. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे त्यांनी मार्गदर्शन घेतले. त्यानुसार हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
जागा निश्चिती
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सर्वात उपयोगी आणि फायदेशीर जागा ही सद्य:स्थितीत साक्री रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारील जागा आहे. आणखी इतरही काही जागांची पाहणी केली जात आहे. दिवसभर आणि सायंकाळीदेखील सौर प्लेटवर सूर्यकिरणे पोहचू शकतील हा त्यामागचा उद्देश आहे. त्या दृष्टीने तज्ज्ञांनी काही जागांची पाहणीदेखील केली. सरकारी जागा मिळाली नाही तर खासगी जागा भाडय़ाने घेण्याचीही पालिकेची तयारी आहे.
शहरातील पथदिवे
शहराचा विस्तार साधारणत: तीन ते चार किलोमीटर परिघात पसरला आहे. अनेक नवीन वसाहती तयार होत आहेत. सर्वच भागात विद्युत पोल, पथदिवे बसविण्यासाठी प्रयत्न आहेत. सद्य:स्थितीत पाच हजार 500 विद्युत पोलवर सात हजार पथदिवे शहरात आहेत. याशिवाय 20 मीटर उंचीचे पाच हायमास्ट लॅम्प आणि 40 पेक्षा अधिक मिनी हायमास्ट लॅम्प आहेत. या सर्वाचा वीज बिलांचा खर्च हा महिन्याला 25 लाखांर्पयत जात असतो.