बनावट नोटा देण्याच्या बहाण्याने नंदुरबारात डॉक्टरला पाच लाखात गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:18 PM2019-03-01T12:18:35+5:302019-03-01T12:18:43+5:30
पाच जणांना अटक : विसरवाडी गावातील प्रकार
नंदुरबार : सहा लाख रुपये दिल्यास १५ लाख रुपयांच्या खऱ्या नोटा देण्याचे अमिष दाखवत निफाड येथील डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना विसरवाडी पोलीसांनी ताब्यात घेतले़ मंगळवारी रात्री विसरवाडी येथे हा बनाव उघड झाल्यानंतर संबधित डॉक्टरने थेट पोलीस ठाणे गाठले़
निफाड येथील डॉ़ विकास निवृत्ती चांदर यांच्या ओळखीतील एकाने सहा लाख रुपये दिल्यानंतर चलनातील खºया नोटांप्रमाणेच हुबेहुब दिसणाºया नोटा मिळत असल्याची माहिती दिली होती़ यानुसार डॉ़ चांदर यांना राजेंद्र संपत ढोमसे रा़ मालपूर ता़ साक्री याने संपर्क करुन सहा लाख रुपये दिल्यावर १५ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळतील असे सांगितले होते़ दोघांमध्ये सौदा पक्का झाला झाल्यानंतर विसरवाडी बसस्टँडजवळ पेट्रोलपंप परिसरात मंगळवारी रात्री नोटा देण्याचे ठरले होते़ त्यानुसार डॉ़ चांदर हे मित्रासोबत निफाड येथून मंगळवारी रात्री विसरवाडी येथे आले होते़ यावेळी घटनास्थळी राजेंद्र ढोमसे याच्यासह अशोक धोंडू मोरे, गौरव दिलीप अहिरराव, केतन भास्कर मोरे, राजेंद्र नवल मालचे सर्व रा़ धाडणे ता़ साक्री हे हजर होते़ डॉ़ चांदर यांच्याकडून पाच लाख रुपये ताब्यात घेतल्यानंतर पाचही जणांनी पोलीस आल्याचा बनाव करत पळापळी सुरु केली़ याची शंका आल्यानंतर डॉ़ विकास चांदर यांनी तातडीने विसरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत प्रकाराची माहिती दिली़ पोलीसांनी घटनास्थळी भेट दिल्यावर पाचही संशयित पसार होण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले़ याबाबत बुधवारी पहाटे डॉ़ चांदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र ढोमसे, अशोक मोरे, गौरव अहिरराव, केतन मोरे, जितेंद्र मालचे यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील करत आहेत़