नंदुरबारमध्ये पूर रेषेच्या गावांचा नव्याने सर्व्हेच नाही
By admin | Published: June 7, 2017 01:46 PM2017-06-07T13:46:33+5:302017-06-07T13:46:33+5:30
१५ वर्षांपूर्वीच्या सर्व्हेवरच उपाययोजना : चार तालुक्यात तर एकही गाव नाही
Next
>आॅनलाईन लोकमत/मनोज शेलार
नंदुरबार,दि.७ - जिल्ह्यातील पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हेच करण्यात आलेला नाही. १५ वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाच्या आधारावरच दरवर्षी उपाययोजना करण्यात येतात. यंदा देखील तीच स्थिती आहे. जिल्ह्यात रेड लाईन अंतर्गत २९ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही सर्व गावे केवळ नंदुरबार व शहादा तालुक्यातीलच आहेत. इतर तालुक्यांमध्ये अशी शक्यताच नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा आहे.
पावसाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्यावर अनेक गावांचा संपर्क तुटतो. अनेक गावातील काही वस्त्या पाण्याखाली येतात. अशा ठिकाणी उपाययोजना कराव्या म्हणून प्रशासन पावसाळ्यापुर्वी बैठका घेवून संबधीतांना सुचना देत असतात. परंतु गांभिर्याने उपाययोजना होतच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी पाचोराबारी गावाची घटना घडली. त्या अनुषंगाने तरी पूर रेषेतील गावांचा नव्याने सर्व्हे होईल अशी अपेक्षा असतांना तसे झाले नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात देखील जुन्याच सर्व्हेवरून संबधीत गावांना सतर्क केले जात आहे.
पूर रेषेतील गावे
जिल्ह्यात पूर रेषेतील २९ गावे प्रशासनाने निश्चित केली आहेत. नदी काठावरील अशा गावांना दोन प्रकारात विभागले जाते. एक रेड लाईनची गावे व दुसरी स्काय लाईनची गावे. स्काय लाईनच्या गावांमध्ये नदीला थोडाजरी पूर आला तरी नदीचे पाणी थेट गावात किंवा गावातील नदीकाठच्या वस्तीत घुसते. तर रेड लाईनच्या गावांमध्ये नदी किंवा नाल्याला अती पूर आला तर ते पाणी थेट गावात घुसते व गावाचा संपर्क तुटतो.
अशी आहेत गावे
रेड लाईन अर्थात लाल पट्ट्यातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येते. या गावांची संख्या २९ असून त्यात शहादा तालुक्यातील १८ तर नंदुरबार तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे.
या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली या गावांचा समावेश आहे. अती पूर आला तरच या गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोपर्यंत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो असेही सांगण्यात आले.
चार तालुक्यात एकही नाही
रेड लाईनची निश्चित केलेल्या गावांच्या भौगोलिक परिस्थितीवर नजर टाकल्यास सर्वच गावे ही केवळ तापी नदी काठावरील निवडण्यात आली आहेत. परिणामी शहादा व नंदुरबार तालुक्यातीलच गावांचा त्यात समावेश झाला आहे.
जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाºया नद्यांमध्ये तापी व्यतिरिक्त नर्मदा ही मोठी नदी तर गोमाई, रंगावली, शिवण, देहली, उदय, सुसरी आदी लहान नद्या देखील आहेत. या नद्यांच्या काठावर देखील मोठ्या प्रमाणावर गावे आहेत. या नद्यांना अतिवृष्टी झाल्यास मोठा पूर देखील येतो. त्याचे पाणी गावालगतच्या वस्तीत शिरते. काही गावांचा संपर्क देखील तुटतो. असे असतांना या नदी काठांवरील गावांचा समावेशच पूर रेषेतील गावांमध्ये करण्यात आलेला नाही हे विशेष.
नव्याने सर्व्हे व्हावा
सध्या नदी, नाल्यांची अवस्था बदलली आहे. काही ठिकाणी नदी व नाल्यांचा प्रवाहात किंचितसा बदल देखील झाला आहे. तापी व इतर नद्यांमधून होणारा वाळूचा बेसुमार उपसांमुळे काठावरील गावांना आधीच पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे नदी, नाल्याला थोडाजरी पूर आला तरी मोठा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. ही बाब लक्षात घेता नव्याने सर्व्हेक्षण व त्यादृष्टीने उपाययोजना होणे देखील आवश्यक ठरणार आहे.