Nandurbar: आदिवासी दुर्गम भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार
By मनोज शेलार | Published: May 24, 2023 05:51 PM2023-05-24T17:51:17+5:302023-05-24T17:54:31+5:30
Nandurbar: आदिवासी दुर्गम भागात सरकारी व खासगी क्षेत्रातील रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित वेतन/मानधनाबरोबरच रुग्णसंख्येच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
मनोज शेलार -
नंदुरबार : आदिवासी दुर्गम भागात सरकारी व खासगी क्षेत्रातील रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित वेतन/मानधनाबरोबरच रुग्णसंख्येच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
आदिवासी भागात आरोग्य सेवेसाठी कुणीही तयार होत नाहीत. एमबीबीएस डॉक्टर मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतो. स्थानिक ठिकाणी उपचार मिळत नाहीत म्हणून जिल्हा रुग्णालयात रुग्णांना थेट रेफर केले जाते. ही बाब लक्षात घेता आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. याबाबत नंदुरबार येथील एका कार्यक्रमात माहिती देताना आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले की, दुर्गम भागात डॉक्टर उपलब्ध व्हावेत, आरोग्य कर्मचारी राहावेत यासाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर आणि कर्मचारी यांना नियमित वेतन किंवा मानधन याच्यासोबतच प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
रुग्णसंख्येच्या आधारावर हे अनुदान राहणार आहे. शासकीयसह खासगी डॉक्टरांनीदेखील उत्कृष्ट सेवा बजावून जास्तीत जास्त रुग्णसेवा केली तर त्यांनाही अशा प्रकारचे अनुदान देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. यामुळे दुर्गम भागात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. याची अंमलबजावणी लवकर व्हावी, निधीची तरतूद व्हावी, यासाठी लवकरच प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचेही मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.