सरळ लढतींमुळे रंगत वाढणार : नंदुरबार पालिका निवडणूक
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: December 3, 2017 01:09 PM2017-12-03T13:09:56+5:302017-12-03T13:10:13+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिका निवडणुकीत काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सातजण रिंगणात असले तरी खरी लढत या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्येच रंगणार आहे. शिवाय तब्बल 17 प्रभागांमध्ये सरळ लढती राहणार आहेत. 15 प्रभागात तिरंगी तर सात प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होणार आहेत. माघारी व चिन्ह वाटपानंतर आता प्रचाराला वेग आला आहे.
नंदुरबारातील पालिका निवडणूक ही काँग्रेस व भाजप यांच्यातच सरळ होईल अशी शक्यता पुर्वीपासूनच राजकीय जाणकारांमध्ये व्यक्त होत होती. घडामोडी देखील तशाच रंगल्या होत्या. माघारीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला असला तरी प्रभागात पक्षाला उमेदवारांची चणचण भासली. एमआयएमने देखील नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देवून काही प्रभागात उमेदवार उभे केले. त्यामुळे 90 टक्के प्रभागात काँग्रेस-सेना युती आणि भाजप यांच्यातच सरळ लढती रंगणार आहेत.
17 प्रभागात दोघेच आमनेसामने
काँग्रेस व भाजपचे दोघेच उमेदवार आमनेसामने राहण्याची स्थिती 17 प्रभागांमध्ये आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये काटय़ाची टक्कर राहणार आहे. कारण मतविभागणीसाठी तिसरा उमेदवार नसल्यामुळे ही स्थिती राहणार आहे. अशा लढती प्रभाग 1 ब, 2 अ, 2 ब, 4 अ, 5 अ, 5 ब, 6 अ, 7 ब, 8 अ, 9 अ, 10 अ, 10 ब, 11 अ, 16 अ, 18 ब, 19 अ व 19 ब मध्ये राहणार आहेत. या प्रभागांमध्ये अनेक लढती रंगतदार होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
15 ठिकाणी तिरंगी लढती
15 प्रभागांमध्ये तिरंगी लढती रंगणार आहेत. या प्रभागातील काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांसमोर काही ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम व राष्ट्रवादीचे उमेदवार तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचे मते फोडण्याचे प्रकार होण्यासाठी देखील काहींना उभे केले आहे. अशा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 1 अ, 3 अ, 3 ब, 4 ब, 6 ब, 7 अ, 9 ब, 12 अ, 13 अ, 14 अ, 14 ब, 15 अ, 17 अ, 18 अ व 19 क या प्रभागांचा समावेश आहे.
सर्वाधिक उमेदवार
यंदा केवळ दोनच प्रभागात पाच पेक्षा अधीक उमेदवार रिंगणात आहेत. त्यात प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये तब्बल आठ उमेदवार तर प्रभाग 13 ब मध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या पंचवार्षिकचा विचार केला असता तब्बल आठ प्रभागात सात पेक्षा अधीक उमेदवार होते. यंदा ही संख्या अवघी दोनवर आली आहे.
हौशी मंडळी बाहेरच
यंदा अनेक हौशी मंडळी इच्छा असूनही निवडणुकीच्या रिंगणाच्या बाहेरच राहिली. काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडे अनेक इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते.
परंतु दोन्ही पक्षांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचा विचार करून तसेच जात, उमेदवाराचे समाजातील वलय, त्याने केलेले काम हे पाहूनच उमेदवारी दिली गेली. परिणामी उमेदवारी नाकारलेल्या अनेकांनी अपक्ष उभे न राहता निवडणूक रिंगणाच्या बाहेरच राहणे पसंत केलेले दिसून येत आहे.