खासदार अमोल कोल्हे यांचा पीए असल्याचे सांगून नंदुरबार पोलिसांची फसवणूक
By मनोज शेलार | Published: June 2, 2023 07:43 PM2023-06-02T19:43:07+5:302023-06-02T19:43:43+5:30
खासदार अमोल कोल्हे यांचा पीए असल्याचे सांगून नंदुरबार पोलिसांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नंदुरबार: खासदार अमोल कोल्हे यांचा पी.ए.असल्याचे सांगत शहादानजीक अपघातग्रस्तांना मदत करावी. तसेच त्यांना आर्थिक मदत करून मुंबईला रवाना करण्याचे सांगत पोलिसांची एक हजार रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी नंदुरबा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जून रोजी रात्री ११ वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मोबाईल क्रमांक (०९३७३९३९११३) यावरुन काहीतरी काम असल्याचा मेसेज आला. त्यानी त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले. त्याअन्वये मोहिते यांनी तात्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, संबधिताने त्यांचे नाव प्रबोधचंद्र सावंत असे सांगून ते खासदार अमोल कोल्हे यांचे पीए असलेबाबत स्पष्ट केेले. मतदार संघातील लोकांच्या एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले.
त्यांनी दिलेला मोबाईल क्रमांकावर फौजदार मोहिते यांनी तात्काळ संपर्क केला असता संबधिताने त्याचे नाव रविकांत मधुकर फसाळे असे सांगितले. बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून ४ जण ठार झाले असून ७जण जखमी आहेत. नियंत्रण कक्ष यांनी तातडीची मदत होण्यासाठी माहिती घेतली असता असा अपघात झाला नसल्याचे समजले. त्यानंतर फौजदार मोहिते यांना पुन्हा त्याच क्रमांकावरून आला. तात्काळ रुग्णवाहिकेने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी सात रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी फौजदार मोहिते यांना कॉल करून सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया आम्हाला जेवणासाठी दोन हजार रुपयांची मदत करावी असे सांगितले. मोहिते यांनी प्रबोधचंद्र यांना हे सर्व सांगितल्यावर खासदार कोल्हे यांचा मदत करण्यासंदर्भात सक्त मेसेज असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मोहिते यांनी रविकांत मधुकर फसाळे याच्या फोन पे अकाऊंटवर एक हजार रुपये पाठविले.
सकाळी मोहिते यांनी नियंत्रण कक्षामार्फत खात्री केली असता अशा प्रकारच्या अपघाताची घटना ही नंदुरबार जिल्हा हद्दीत तसेच आजुबाजुच्या जिल्ह्यात देखील घडलेली नसल्याचे समजले. त्यामुळे अनोळखी मोबाईल क्रमांक धारक रविकांत मधुकर फसाळे यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे पीए प्रबोधचंद्र सावंत यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती दिली व पोलिसांची आर्थिक फसवणूक केली. तसेच पोलीस खात्याला अपघाताबाबत खोटी माहीती देवून विनाकारण कामाला लावून शासकीय कामकाजाचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात संबधितांविरुद्ध फसवणूक व सायबर क्राईम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.