नववर्ष स्वागतासाठी नंदुरबारकर सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 02:32 PM2017-12-31T14:32:41+5:302017-12-31T14:32:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेकांनी विधायक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे तर काहींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विविध कामांचा शुभारंभ करण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान, मद्य पिऊन वाहन चालविणा:यांवर कारवाईचा इशारा पोलीस दलाने दिला आहे. दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य सेवनाचे एका दिवसाचे 20 हजार परवाने वितरीत केले आहेत.
रविवार सुटीचा दिवस आणि 31 डिसेंबर हा योगायोग जुळून आल्याने हा दिवस साजरा करण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारे नियोजन करून ठेवले आहे. शहरातील विविध हॉटेल्स, धाबे यांच्यात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येत आहेत. नागरिकांचा, युवकांचा उत्साहाला आवर घालण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागाने देखील विविध उपाययोजना केलेल्या आहेत. दुसरीकडे महसूल वाढीसाठी दारूबंदी विभागाने मात्र जवळपास 20 हजार एकदिवशीय परवाने वितरीत करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
हॉटेल्स, धाब्यांवर तयारी
शहरासह जिल्ह्यातील अनेक धाबे, हॉटेल्स यावर 31 डिसेंबर रोजी होणा:या जेवनावळींसाठी, पार्ट्ीसाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे.
ठराविक बिलावर सुट देण्याचे अमिषही ग्राहकांना दाखविण्यात आले आहे. दररोजपेक्षा अतिरिक्त अर्थात जादा टेबलांचे नियोजनही अशा हॉटेल्स व धाब्यांवर करण्यात आले आहे.
विद्युत रोषणाई
सार्वजनिक इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच काही धार्मिक ठिकाणांवर नववर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी नाताळ आणि नववर्ष याचा संगम साधत विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
सामाजिक उपक्रमही..
नववर्षाचे स्वागत सामाजिक उपक्रमांद्वारे आयोजित करण्याचे नियोजन देखील काही संस्था, संघटनांनी केले आहे. शहरात दोन ठिकाणी 1 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर होणार आहे. एका ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर देखील आयोजित केले आहे. काहींनी 31 रोजी रात्री 12 वाजता केक कापून नववर्ष साजरे करण्याचा संकल्प देखील केला आहे.
पोलिसांतर्फे सतर्कता
नववर्षाच स्वागताच्या नावाखाली मद्य पिऊन धिंगाणा घालणे, भरधाव वाहने चालविणे असे प्रकार होतात. त्यातून अपघात देखील होतात. ही बाब लक्षात घेता पोलीस विभागातर्फे यावर्षी पोलिसांतर्फे सतर्कता ठेवण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या उत्तररात्री मद्य पिऊन वाहन चालविणे, वेगात वाहन चालविणे, मोठय़ाने हॉर्न वाजवत ध्वनीप्रदुषण करणे आदी प्रकार होतात. यामुळे अपघात होऊन अनेकांना जायबंदी व्हावे लागते, आपला जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता या घटनांना प्रतिबंध बसावा यासाठी जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेतर्फे रविवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे चार वाजेर्पयत विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यात शहराला जोडणा:या प्रमुख रस्त्यांवर तसेच प्रमुख चौकांवर नाकाबंदी दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करण्यात येणार असून ब्रेथ अॅनालायझरने मद्याचे सेवन करून वाहन चालविणा:या चालकांची पडताळणी करण्यात येऊन चालक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे जनतेने, वाहनचालकांनी मद्याचे सेवन करून वाहन न चालविता कुठल्याही प्रकारचा अपघात, गैरकृत्य व कायदेशीर कार्यवाहीपासून दूर राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.