नंदुरबारातील १७ भाग केले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:22 PM2020-04-19T12:22:40+5:302020-04-19T12:22:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पहिला कोरोना संसर्गीत रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली होती. ज्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पहिला कोरोना संसर्गीत रुग्ण सापडल्यानंतर शुक्रवारी रात्रीच प्रशासनाने उपाययोजनांना सुरुवात केली होती. ज्या भागात हा रुग्ण सापडला तो भाग रात्रीच सील करण्यात आला. शिवाय जंतूनाशक फवारणी करून हा भाग सॅनिटाईझ करण्यात आला. दरम्यान, संपुर्ण नंदुरबार शहर लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व व्यवहार बंद होते. सोमवारपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या एका संशयीत कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तातडीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेवून त्यांचा शोध घेवून त्यांची पहिले आरोग्य तपासणी करीत त्यांना कॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर रुग्ण राहत असलेला भाग तातडीने सील करण्यात आला.
साधारणत: एक किलोमिटरचा भाग सील करण्यात येवून रात्रीच या भागात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. पहाटेपर्यंत हे सर्व कामे आरोग्य विभाग, पालिकेचा स्वच्छता विभाग आणि पोलिसांच्या उपस्थित सुरू होता.
१७ ठिकाणे केली सील
रुग्ण सापडलेल्या भागासह परिसरातील भाग अर्थात या भागातील रस्ते, गल्लीबोळ असे सर्व १७ भाग सील करण्यात आले. या भागासह परिसरातील एक किलोमिटर परिसरात कुणालाही बाहेर निघण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केवळ दवाखाने, औषधी दुकाने सुरू होती. त्यांच्याततही शुकशुकाट असल्याने ती देखील दुपारनंतर बंद दिसून आली. याशिवाय १४ ठिकाणी बॅरीकेड्स लावण्यात आली होती. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार हे स्वत: उपस्थित होते.
जंतूनाशक फवारणी
या परिसरात रात्रीच पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जंतूनाशक अर्थात सोडियम हायपोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी करण्यात आली. त्यात अलीसहाब मोहल्ला, फकिल मोहल्ला, बालाजीवाडा, दखनी गल्ली, मणियार मोहल्ला, बिसमिल्ला चौक, बिफ मार्केट रोड, रज्जाक पार्क, अमिन भैय्या चाळ, चिंचपाडा भिलाटी, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, जूना बैलबाजार या ठिकाणांचा समावेश होता.
चौकाचौकात बंदोबस्त
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना प्रतिबंध व्हावा यासाठी सकाळी सात वाजेपासूनच चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. शहरालगतच्या चारही बाजूंच्या चौफुलींवरच शहरात येणारी वाहने अडविण्यात येत होती. त्यामुळे दिवसभर शहरात शुकशुकाट होता. कुणीही बाहेर निघतांना दिसून आले नाही. केवळ पोलिसांची गस्ती वाहने रस्त्यावर दिसून येत होती.
घराबाहेर पडू नका...
शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच रहावे. अनावश्यक बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे.