नंदुरबार तालुक्यात 65 जागांसाठी 144 उमेदवारांमध्ये रंगताहेत लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:00 PM2021-01-07T13:00:05+5:302021-01-07T13:00:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात १५ ग्रामपंचायती माघारीअंति बिनविरोध झाल्या होत्या. यातून तालुक्यात केवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात १५ ग्रामपंचायती माघारीअंति बिनविरोध झाल्या होत्या. यातून तालुक्यात केवळ सात ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, गावोगावी मतदानाचा उत्साह कायम आहे. या गावांमध्ये सध्या जोरदार प्रचार रंगत आहेत.
तालुक्यातील खुर्दे खुर्द, बलदाणे, खोक्राळे, निंभेल, न्याहली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द, तिलाली, आराळे, खोंडामळी, मांजरे, शिंदगव्हाण, विखरण, नगाव आणि काकर्दे या १५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. सात ग्रामपंचायती या अर्ज छाननीच्या दिवसापासून बिनविरोध झाल्याचे चित्र होते, तर आठ ग्रामपंचायतींसाठी दाखल अर्ज माघारी गेल्यानंतर त्या बिनविरोध झाल्या होत्या. ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे मतदान केंद्रांची संख्या घटून प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान कोपर्ली, भालेर, हाटमोहिदे, भादवड, कार्ली, कंंढ्रे, वैंदाणे या सात ग्रामपंचायतींच्या ६५ सदस्य पदाच्या जागांसाठी एकूण १४४ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांकडून प्रचारालाही सुरुवात झाली असून, गावोगावी पॅनलच्या माध्यमातून निवडणूका लढवल्या जात आहेत. यात प्रामुख्याने भालेर येथे ११ सदस्य पदाच्या जागांसाठी ३०, तर कोपर्ली येथील ११ सदस्यपदांच्या जागांसाठी २५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रचाराची पद्धत उमेदवारांनी बदलल्याचे दिसून येत आहे. गावे खूप मोठी नसल्याने दहा दिवसांत प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणे उमेदवाराला शक्य असल्याने घरोघरी थेट भेट देत उमेदवारीची माहिती देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना साकडे घालण्याचा कार्यक्रम उमेदवारांचा सुरू आहे. यातून गावोगावी मौखिक प्रचाराचे युद्धही रंगत आहे. या निवडणुकीसाठी २५ ते ३५ हजार रुपयांचा खर्च सदस्यपदाच्या जागांसाठी करावा लागणार आहे. परंतू निवडणुकीची रंगत पाहता यापेक्षा अधिक खर्च होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची धावपळ होत आहे.
१३ हजार मतदार
या निवडणुकीत कोपर्ली ग्रामपंचायतीच्या ११ प्रभागांत ३ हजार १९९, कंढ्रे येथील सात प्रभागांसाठी ८०६, कार्ली येथील नऊ प्रभागांसाठी एक हजार १७२, भादवड येथील नऊ प्रभागांसाठी १ हजार ५१९, भालेर येथील ११ प्रभागांसाठी २ हजार ८५६, हाटमोहिदे येथील नऊ प्रभागांसाठी १ हजार ८५०, तर वैंदाणे येथील नऊ प्रभागांसाठी २ हजार ४८६ असे एकूण १३ हजार ८८८ मतदार मतदान करणार आहेत.
२३ मतदान केंद्र
मतदानप्रक्रियेसाठी नंदुरबार तहसील कार्यालयाने २३ मतदान केंद्र निर्माण केले आहेत. ३० पथकांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक पथकात पाच याप्रमाणे १५० कर्मचारी नियुक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण असून, दुसरे प्रशिक्षण १० जानेवारी रोजी आहे. प्रशिक्षणानंतर १४ जानेवारी रोजी हे मतदान अधिकारी व कर्मचारी सात ग्रामपंचायतींच्या २३ मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.