विकसनशील शहरांमध्ये नंदुरबार राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:59 AM2017-08-14T00:59:07+5:302017-08-14T01:00:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नंदुरबारची ओळख निर्माण झाली आहे. राज्यातील एक स्मार्ट शहर म्हणून नंदुरबार नावारूपास आले आहे. समर्पित भावनेने काम केल्यावरच हे शक्य होते, असे प्रतिपादन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नंदुरबारात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले.
नंदुरबार पालिकेतर्फे उभारण्यात आलेले दादासाहेब बटेसिंह रघुवंशी उद्यान, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ई-लायब्ररी, आरोग्य सुविधा केंद्राचे उद्घाटन व सुवर्ण जयंती रोजगार योजनेअंतर्गत बचत गट व महिलांना विविध वस्तूंचे वाटप राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाशेजारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत, माजीमंत्री आमदार सुरूपसिंग नाईक, आमदार अॅड.के.सी. पाडवी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार कुणाल पाटील, आमदार डी.एस. अहिरे, आमदार काशीराम पावरा, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, शिरपूरचे नगराध्यक्ष भुपेश पटेल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, आदिवासी कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, जि.प. चे माजी अध्यक्ष भरत गावीत, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.राजेंद्र रघुवंशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राजकारण करताना समर्पित भावनेने काम केले पाहिजे. माजी आमदार कै.बटेसिंह रघुवंशी यांची काम करण्याची पद्धत तीच होती. तीच परंपरा आमदार चंद्रकांत रघुवंशी हे चालवित आहेत. शहर विकासाच्या योजना राबवितांना सामान्य घटक डोळ्यासमोर ठेवला गेला पाहिजे. नागरी सुविधा देतांना शहराचा विकास आणि बेरोजगार हातांना काम कसे मिळेल हे देखील पाहिले पाहिजे. नंदुरबार पालिकेतर्फे ते पाहिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात नागरिकरण झपाट्याने वाढत आहे. पूर्वी १८ टक्के असलेला वेग आता ५२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शहर विकास आणि मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मोठे नियोजन करावे लागणार आहे. सध्या राजकारणाचा धंदा झाला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कुठून काय आणि कसे मिळेल यावरच डोळा राहत आहे. त्यामुळे चांगली पिढी राजकारणात आली पाहिजे, अशी अपेक्षाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेने केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. आपण गेल्या निवडणुकीत दिलेले सर्व आश्वासनांची पूर्तता केली आहे. नंदुरबारात काय आहे असे विचारण्यापेक्षा काय नाही असे विचारले जाते. येत्या काळात गरीब, सर्वसामान्यांसाठी औषधालय सुरू करण्याचा मानस आहे. त्यात २५ ते ३० टक्के कमी दराने औषधी उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या अत्यल्प शुल्कात विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्यातील एक आदर्श शहर बनविण्याचा आपला संकल्प असून तो पूर्णत्वास येत असल्याचा आनंद असल्याचेही आमदार रघुवंशी यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.डॉ. माधव कदम यांनी केले. या वेळी नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अध्यक्षा विमलबाई रघुवंशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र मराठे, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, मुख्याधिकारी गणेश गिरी, बाजार समितीचे सभापती भरतभाई पटेल, माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, शेतकरी संघाचे सभापती बी.के. पाटील, मजूर फेडरेशनचे किरण पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, सभापती निखिल रघुवंशी, शकुंतला मोहन माळी, वंदना कैलास पाटील, नगरसेवक राजेश परदेशी, निंबा माळी, मोहन माळी, करिश्मा बोरसे, विद्या शिंदे, लीला साळवे, अनिल पाटील, भरत पाटील, बापू पाटील आदी उपस्थित होते.