Nandurbar: कर्तव्यावर दारुत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची ट्रिंग ट्रिंग
By भूषण.विजय.रामराजे | Published: October 8, 2023 04:33 PM2023-10-08T16:33:37+5:302023-10-08T16:34:23+5:30
Nandurbar News: राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे.
- भूषण रामराजे
नंदुरबार - राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारात कर्तव्य बजावतानाच दारुच्या नशेत झिंगणाऱ्या वाहतूक नियंत्रकासह दोन वाहक, चालक, स्वच्छक आणि लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे. आगारप्रमुखाला मारहाण केल्याच्या प्रकारानंतर विभाग नियंत्रकांनी ही कारवाई केली आहे.अक्कलकुवा आगारातील कर्मचाऱ्यांनी मद्यप्राशन केल्याच्या तक्रारी वेळाेवेळी समोर आल्या होत्या. यातून आगार व्यवस्थापकाला मद्यधुंद अवस्थेतील निलंबित दोन वाहकांनी मारहाण केली होती. यातून आगारातील स्थितीचा आढावा घेत विभाग नियंत्रक विजय गिते यांनी याठिकाणी भेट दिली होती.
यावेळी वाहतूक नियंत्रक विनायक वाल्मीक साबळे, वाहक मनोज प्रताप पवार, वाहक सतीश नाथराव मुंडे हे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान केलेल्या स्थिती आढळून आल्याने त्यांना जागेवर निलंबित करण्यात आले. दरम्यान आगार प्रशासनाचे आगार झुगारणाऱ्या चालक गजानन चंद्रभान सलाम, लिपिक तुकाराम रामकृष्ण कोळी व स्वच्छक सुभाष गंगा भिल यांनाही निलंबित करण्यात आले आहे.काही महिन्यांपूर्वी मोलगी ते अक्कलकुवा दरम्यान घाटामध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याच्या गंभीर प्रकारही प्रवाशांनी समोर आणला होता. यातून आगारातील कर्मचाऱ्यांच्या मद्यपानाचे अनेक किस्सेही समोर येत होते. यादरम्यान निलंबित वाहकांनी आगार प्रमुखाला मारहाण केल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते.