Nandurbar: लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून केला खून
By मनोज शेलार | Published: August 26, 2023 07:23 PM2023-08-26T19:23:09+5:302023-08-26T19:23:34+5:30
Nandurbar Crime News: पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तुझ्यामुळे त्रास होत असल्याचे सांगितल्याचा राग येऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना वागदी, ता.नवापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
- मनोज शेलार
नंदुरबार - पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तुझ्यामुळे त्रास होत असल्याचे सांगितल्याचा राग येऊन लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना वागदी, ता.नवापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडली. या घटनेत वहिनीच्याही डोक्यात कुऱ्हाडीने वार करून, तिलाही गंभीर जखमी करण्यात आले आहे.
घटनेनंतर संशयित फरार झाला आहे. विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नरेश रवसू वळवी (३९) असे मयताचे नाव आहे, तर सरिता वळवी (३४) असे जखमी महिलेचे नाव आहे. संशयित विश्वास रवसू वळवी (३४) हा फरार झाला आहे. विश्वास याने गावातील एका महिलेस मारहाण केल्याने, दोघा भावांवर गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला चालू आहे. शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी रात्री संशयित विश्वास वळवी हा त्याचा मोठा भाऊ नरेश वळवी याच्या घरी आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना नरेश याने, तुझ्यामुळे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचे सांगितले.
त्यामुळे विश्वास याला त्याचा राग आला. त्याने घरातील कुऱ्हाड काढून नरेश याच्या डोक्यावर वार केले. त्यात तो जागीच ठार झाला, तर नरेशची पत्नी सरीता वाचविण्यास गेली असता, तिच्या डोक्यातही कुऱ्हाड टाकल्याने तीही जखमी झाली. महिलेस विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे पोलिस उपनिरीक्षक किरण पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत विसरवाडी पोलिस ठाण्यात सरीता नरेश वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवर संशयित विश्वास रवसू वळवी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे करीत आहेत. संशयित विश्वास वळवी हा या घटनेनंतर फरार झाला आहे.