नंदुरबारकरांना आता आधुनिक लॅब आणि रूग्णालयाची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 01:05 PM2020-07-23T13:05:59+5:302020-07-23T13:06:19+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा कहर सुरू होऊन चार महिन्याचा काळ लोटला असताना नंदुरबारात मात्र ...
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा कहर सुरू होऊन चार महिन्याचा काळ लोटला असताना नंदुरबारात मात्र आत्ताशी आधुनिक लॅब आणि केवळ विद्युतीकरणाअभावी अपूर्ण असलेल्या महिला रूग्णालयाचे काम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. खरं तर महामारीच्या गंभीर काळात उपाययोजनांबाबत होणारी ही दिरंगाई भूषणावह नसली तरी किमान त्यानिमित्ताने का होईना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत ही समाधानाची बाब आहे. या सोयी १५ आॅगस्टपर्यंत सुरू करण्याचे प्रशासनाचे मानस असल्याने आता त्याचीच जिल्हावासीयांना प्रतीक्षा आहे.
कोेरोना या संसर्गजन्य विषाणुमुळे सारे जग हादरले आहे. महाराष्टÑातही कोरोनाचा फैलाव देशात सर्वाधिक आहे. त्यादृष्टीने संपूर्ण राज्यभर विविध आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नंदुरबार जिल्हा तसा नेहमीसारखा या सुविधांच्या विस्तारातही उपेक्षितच राहिला आहे. महाराष्टÑात सुरूवातीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या जवळपास नव्हती. पण लॉकडाऊननंतरही बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. दुर्देवाची बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना तपासणीची लॅब नसल्याने येथील स्वॅब धुळे-पुणे व नाशिकला पाठवून तपासले जात होते. साहजिकच ही संख्या कमी असल्याने रूग्णांची संख्याही कमी होती. नंदुरबार जिल्ह्यात खाजगी सुपर स्पेशालिटी दवाखानेही नसल्याने अनेक रूग्ण सुरत, नाशिक, अहमदाबाद, मुंबई, पुणे आदी ठिकाणी उपचारासाठी जात होते. तेथेदेखील खाजगी रूग्णालयात जिल्ह्यातील अनेक कोरोनाचे रूग्ण उपचार करून आले. पण त्याची अधिकृत नोंद नाही. जी शासकीय रूग्णालयामार्फत तपासणी झाली त्याचीच नोंद असल्याने संख्या कमी राहिली.
गेल्या १०-१२ दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात स्वॅब तपासणीची कमी क्षमतेची लॅब सुरू झाली. त्यामुळे रूग्णांची संख्याही वाढू लागली. खरेतर अजूनही पूर्ण स्वॅब तपासणी करण्या इतपत क्षमतेची लॅब नंदुरबारला नसल्याने स्वॅब तपासणीसाठी धुळे व इतर ठिकाणी पाठविले जात आहे. त्यामुळे साहजिकच अहवाल मिळण्यास काही कालावधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. याच काळात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याने आता नंदुरबारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी नंदुरबारसाठी आधुनिक लॅब सुरू करण्याचा पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, नंदुरबारला सुमारे एक कोटी ६५ लाख रूपये खर्च करून आधुनिक लॅब उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या मशिनरीची आॅर्डरही देण्यात आली असून, ती सिंगापूरहून येणार आहे. साधारणत: रोज एक हजार २०० स्वॅब तपासणी क्षमता असलेली ही लॅब राहणार आहे. ही क्षमता पाहता उत्तर महाराष्टÑातील पाच ही जिल्ह्यातील सर्वात मोठी लॅब येथे उभारली जाणार आहे. या लॅब बरोबरच नंदुरबारमध्ये अद्यापतरी केवळ २५ आॅक्सिजन बेडची सुविधा आहे. याशिवाय नर्सिंग कॉलेजला १० आॅक्सिजन बेडची सुविधा आहे. सद्य:स्थितीत रूग्णांची संख्या वाढत असल्याने या सुविधांचाही विस्तार आवश्यक आहे. त्यामुळे सातत्याने विस्ताराची चर्चा सुरू असताना १०० आॅक्सिजन बेडची सुविधा लवकरच सुरू करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या सुविधा होत असताना गेल्या वर्षभरापासून केवळ इलेक्ट्रीक फिटींगअभावी अपूर्ण असलेले महिला रूग्णालयदेखील तत्काळ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वास्तविक डॉ.विजयकुमार गावीत हे वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना त्यांच्या काळात या रूग्णालयाची सुरूवात झाली. रूग्णालयाच्या बांधकामासाठी निधीही वेळीच उपलब्ध झाल्याने त्याचे बांधकामही झाले आहे. पण वर्षभरापासून केवळ किरकोळ कामाअभावी ते प्रलंबित होते. वास्तविक कोरोनाची सुरूवात झाली त्याच काळात जर प्रलंबीत कामे जलद गतीने झाले असते तर कोरोना रूग्णांसाठी हे रूग्णालयदेखील वापरता आले असते. त्यासाठी दुसºया इमारतीत जाण्याची गरज भासली नसती. पण उशिरा का असेना हे रूग्णालयदेखील तत्काळ सुरू करण्याचे प्रशासनाने निर्धार केला आहे. ते स्वागतार्ह आहेच.
किमान आतातरी या कमांना विलंब होऊ नये. कारण गेल्या काही दिवसातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या ही नंदुरबारकरांना धडकी भरविणारी आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण आटोक्यात यावे व रूग्णांनाही सुविधा मिळाव्यात यासाठी आता तत्काळ नियोजन करण्याची गरज आहे. रूग्णांची संख्या वाढू नये असेच सर्वांचे प्रयत्न असल्याने ही संख्या वाढणार नाही अशीच सर्वांची प्रार्थना आहे. पण त्यानिमित्ताने प्रशासनाने जे १५ आॅगस्टपूर्वी आधुनिक कोविड तपासणी लॅब व महिला रूग्णालय सुरू करण्याचा संकल्प केला आहे. तो पूर्णव्हावा, अशीच जिल्हावासियांची अपेक्षा आहे.