कृत्रीम पाणी टंचाईने नंदुरबारकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:18 PM2018-04-24T13:18:26+5:302018-04-24T13:18:26+5:30
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाईपलाईन फोडण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न, पाच दिवसांपासून समस्या
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : गेल्या दोन आठवडय़ापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात तर गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकलेला नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत केले जात नसल्यामुळे किंवा पर्यायी व्यवस्थाही होत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा आहे. आणखी चार ते पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. गेल्या आठवडय़ात मुख्य पाईपलाईनला नवीन व्हॉल्व बसविण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. हा व्हॉल्व बसविल्यानंतर तो लागलीच दोन दिवसांनी तो लिक झाला. परिणामी पाईपलाईनमध्ये माती जात होती. त्यासाठी पुन्हा तो व्हॉल्व दुरूस्त करण्यात आला. ते काम होत नाही तोच धुळे रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला कुणीतरी विघअसंतोषी व्यक्तीने खिळा ठोकून दिला होता. त्यामुळे पाईपलाईन लिकेज होत होती. त्याच्या दुरूस्तीसाठी पुर्ण पाईपलाईन बंद करावा लागली. ओलसर पणामुळे लिकेजच्या ठिकाणी वेल्डींग देखील करता येत नव्हते. परिणामी पुर्ण पाईपलाईनमधील पाणी काढून ती कोरडी करावी लागली. त्या कामाला देखील दोन दिवस लागले. त्यानंतर निर्धारित कालावधीत जलकुंभ स्वच्छता करण्यात आले. ते भरण्यासाठी पुन्हा एक दिवस गेला.
या सर्व कारणांमुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक पुर्णत: कोलमडले आहे. धुळे रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याकडे अधिकारी व पदाधिका:यांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबत पालिकेकडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत करण्यात आले नसल्यामुळे नागरिक अनभिज्ञ राहिले. शिवाय ज्या भागात तीनपेक्षा अधीक दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही अशा भागात पालिकेने टँकर देखील पुरविले नसल्यामुळे नागरिकानी संताप व्यक्त केला. सोमवारी सायंकाळर्पयत वेळापत्रक कोलमडलेलेच होते. यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. उद्रेक होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.
एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा..
शहरात एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार नाही हे स्पष्टच आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा वेळापत्रक विस्कळीत होते. त्यासंदर्भात पालिकेने नागरिकांना वेळोवेळी सुचीत करणे किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाहन करणे देखील आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
शहराला विरचक प्रकल्पातून तसेच आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंबेबारा धरणातील 50 टक्के पाणीसाठा आरक्षीत करण्यात येतो. त्यानुसार सध्या आंबेबारा धरणातून देखील आष्टे पंपींग स्टेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकर पुरविणे आवश्यक असतांना त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.