‘दगड’ उचलण्याची नंदुरबारातील प्रथा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:19 AM2018-04-18T11:19:36+5:302018-04-18T11:19:36+5:30
सालदार ठेवण्याऐवजी आता रोख रक्कमेचे बक्षीस
मनोज शेलार
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 18 : शेतीतील यांत्रिकीकरणामुळे ‘सालदार’की आता कालबाह्य ठरली आहे. परंतु पूर्वी अक्षय तृतीयेला सालदार ठरवितांना जी पद्धत व परंपरा होती ती येथील माळीवाडय़ात आजही कायम आहे. ‘आ देखे जरा, किसमे कितना है दम..’ म्हणत जो जास्त वजनाचा दगड उचलेल त्याला सालदार ठेवले जात होते आता केवळ रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.
खान्देशात पूर्वी अक्षय तृतीयेला सालदारांची नेमणूक केली जात होती. पूर्वी शेतीतील यांत्रिकीकरण नव्हते, त्यामुळे केवळ मणुष्यबळावरच शेतीची कामे अवलंबून राहत होती. त्यामुळे सालदारांना मोठी मागणी राहत होती. वर्षाचे ठराविक पैसे देवून, धान्य व कपडे देवून त्याची राहण्याची व्यवस्था शेतक:याकडे करावी लागत होती. सालदार ठरवितांना अनेक प्रथा व परंपरा होत्या. त्यातीलच एक नंदुरबारातील माळीवाडय़ातील ‘दगड उचलण्याची’ प्रथा होय. माळीवाडय़ातील सार्वजनिक चौकात अक्षय तृतीयेला पूर्वी पहाटेपासूनच ही स्पर्धा सुरू होत होती. त्यासाठी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित राहत होते. एक क्विंटलपासून पाच क्विंटलर्पयत वजनाचा दगड एका दमात उचलून तो खांद्यावर ठेवण्याची ही स्पर्धा राहत होती. जो व्यक्ती एका दमात दगड उचलत होता. त्याला सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतक:यांमध्येही स्पर्धा लागत होती. अशावेळी जास्तीत जास्त पैसा जो देईल त्या शेतक:याला असे सालदार पसंती देत होते.
आता ही परंपरा कालबाह्य ठरली असली तरी त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी दरवर्षी अक्षय तृतीयेला ही स्पर्धा घेतली जाते. आता सालदार न ठेवता एका दमात जो दगड उचलेल त्याला रोख रक्कम म्हणून बक्षीस दिले जाते. बुधवारी देखील सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणावर या स्पर्धेसाठी गर्दी झाली होती. जास्तीत जास्त एक क्विंटलर्पयत दगड उचलण्यात यावेळी यश आले. यावेळी संतोष माळी, दिनेश ठाकरे, भैय्या ठाकरे यांना रोख बक्षीसे देण्यात आली.
यावेळी माणिक माळी, पंडित माळी, जगन माळी, शिवाजी माळी, भाईदास माळी, धनराज माळी, सुकदेव माळी आदी उपस्थित होते.