नंदुरबारचे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र डिजीटल होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:37 PM2018-01-30T12:37:34+5:302018-01-30T12:37:40+5:30
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दूरदर्शनची कमी दाबाची सहप्रक्षेपण केंद्र बंद होत असतांना दुसरीकडे नंदुरबार या जिल्ह्याच्या ठिकाणच्या सहप्रक्षेपण केंद्राला हायपॉवर करण्यात येणार आहे. यामुळे एकाचवेळी पाच चॅनेल प्रक्षेपीत होणार असून एफ.एम.आकाशवाणी केंद्राचेही प्रक्षेपण त्याद्वारे होणार आहे. मात्र, त्यासाठी जागेची अडचण असून जिल्हास्तरावर तातडीने जागेचा प्रश्न सुटणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात नंदुरबारसह शहादा, नवापूर व धडगाव येथे दूरदर्शनची सहप्रक्षेपण केंद्र आहेत. याशिवाय खान्देशात अर्थात जळगाव कार्यक्षेत्रात जळगाव, अमळनेर, शिरपूर, पिंपळनेर, धुळे ही सहप्रक्षेपण केंद्र आहेत. नवापूर, पिंपळनेर, अमळनेर, रावेर ही सहप्रक्षेपण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याउलट नंदुरबार केंद्राची क्षमता वाढविणे, त्याचे डिजीटलायङोशन करणे, तेथूनच एफ.एम.केंद्र सुरू करणे आदी प्रस्तावीत आहे. परंतु जागेचा प्रश्न कायम आहे.
80 च्या दशकात सुरू
नंदुरबारात 80 च्या दशकात दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र नंदुरबारसह शहादा व नवापूर येथे सुरू करण्यात आले होते. नंदुरबारातील केंद्र 31 ऑक्टोबर 1989 रोजी सुरू करण्यात आले. धडगाव येथे 90 च्या दशकात लघु प्रक्षेपण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले होते. त्या काळी केवळ दूरदर्शनच्या लघु प्रक्षेपण केंद्रातूनच दूरदर्शनचे एकच राष्ट्रीय व काही कालावधीनंतर प्रादेशिक चॅनेल सहक्षेपीत करण्यात येत होते. त्यासाठी अॅण्टेणा लावावा लागत होता. परंतु 90 च्या दशकात केबलद्वारे विविध दूरचित्रवाणी चॅनेल प्रक्षेपीत करण्यात येऊ लागल्याने हळू हळू दूरदर्शची क्रेझ कमी होऊ लागली. नंतरच्या काळात डीटीएच ने तर दूरदर्शनच हद्दपार करून टाकले. गेल्या दहा ते 15 वर्षापासून ही केंद्रे रखड-रखडतच सुरू होती.
नंदुरबारचे केंद्र डिजीटल
नंदुरबारात असलेले दूरदर्शनचे लघु प्रक्षेपण केंद्र हे शहरातील खोडाई माता रस्त्यावरील भाडय़ाच्या इमारतीत सुरू आहे. सध्या असलेली जागा अतिशय तोकडी आहे. या केंद्राचे आता डिजीटलायङोशन करण्यात येणार आहे. नवीन मशिनरींच्या माध्यमातून एकाच वेळी दूरदर्शनची पाच चॅनेल सहक्षेपीत होणार आहेत. त्यात राष्र्टीय चॅनेलसह न्यूज, प्रादेशिक, लोकसभा आणि स्पोर्ट चॅनेलचा समावेश राहणार आहे. सध्या या लघु प्रक्षेपण केंद्राची क्षमता केवळ 100 व्ॉट असून नवीन क्षमतेत ते 10 के.व्ही.चे होणार आहे. त्याद्वारे जिल्हाभर त्याची रेंज राहणार आहे. याशिवाय स्मार्ट मोबाईलला विशिष्ट उपकरण लावल्यावर ऑफलाईनही ही पाच चॅनेल नागरिकांना मोबाईलवर पहाता येणार आहेत. सध्या लघुप्रक्षेपण केंद्रातून दिवसभर राष्ट्रीय चॅनेलचे तर दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत प्रादेशिक चॅनेलचे सहक्षेपण केले जाते.
एफ.एम.ही सुरू होणार
केंद्र शासनाच्या धोरणानुसार तीन फेजनुसार अर्थात महानगर, महापालिका क्षेत्र असलेले शहरे आणि नंतर फेज तीन मध्ये इतर शहरांमध्ये एफएम केंद्र सुरू करण्याचे धोरण आहे. त्यानुसार फेज तीन मध्ये नंदुरबारात एफएम केंद्र सुरू होणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे. दूरदर्शनच्या याच लघुप्रक्षेपण केंद्रातून एफ.एम.चेही सहक्षेपण होणार आहे. यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी दोन वर्षापासून प्रय} सुरू केले आहेत.
शहादा, धडगावही बंद होईल
नंदुरबार केंद्राची क्षमता वाढल्यानंतर ते संपुर्ण जिल्हा कव्हर करणार आहे. त्यामुळे शहादा व धडगाव ही लघुप्रक्षेपण केंद्रही पुढील काळात बंद होऊ शकतील अशी शक्यता आहे.
जागेची अडचण
नंदुरबारचे सध्याचे केंद्र हे कमी जागेत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. नवीन व उच्च क्षमतेचे केंद्र सुरू करण्यासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यासाठी प्रसार भारतीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे जागेचीही मागणी करण्यात आली असल्याचे समजते. परंतु ती अडचण अद्याप दूर झालेली नाही. जागा मिळताच नवीन उच्च क्षमतेच्या लघु प्रक्षेपण केंद्राचे काम लागलीच सुरू होण्याची शक्यता आहे.