नंदुरबारकरांची खड्डेमुक्तीसाठी अजूनही प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:24 PM2017-12-17T13:24:29+5:302017-12-17T13:24:33+5:30
नंदुरबार जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे प्रमुख रस्ते तसेच राज्य मार्गावर काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले आह़े परंतु अजूनही जिल्हा संपूर्णपणे खड्डेमुक्त झाला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ नंदुरबार शहरातील नंदुरबार-दोंडाईचा रस्ता, नवापूर-पिंपळनेर मार्ग, विसरवाडी ते सेंधवा, तापी पुल आदी मार्गावरील खड्डे अद्याप कायम आहेत़ नवापूर, तळोदा तसेच अक्कलकुवा या तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात आले असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला आह़े दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खड्डे भरण्याच्या कामात अनेक अडथळे आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार यांनी सांगितले आह़े
जादा मनुष्यबळाचा वापर.
गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील बुजविलेले खड्डे पुन्हा पूर्ववत झाल्याचे सार्वजनिक विभागाकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याची ‘रिकव्हरी’ करण्यासाठी जादा मनुष्यबळ वापरण्यात येणार असल्याची माहिती नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आह़े
नवापूर-पिंपळनेर मार्ग
नवापूर-पिंपळनेर मार्गाची खड्डयांमुळे मोठय़ा प्रमाणात स्थिती बिकट आह़े येत्या दोन ते तीन दिवसात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आह़े या कामासाठी एका युनिट ऐवजी तीन युनिट कार्यान्वित करण्यात आले आह़े त्याच प्रमाणे विसरवाडी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वरील खड्डयांचेही काम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े
दरम्यान, नंदुरबारातील अत्यंत वर्दळीचा असलेला नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला जरी यश आले असले तरी अजूनही लहान खड्डे दुर्लक्षीत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे लहान खड्डयांना बुजविण्याचेही आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागासमोर असल्याचे सांगण्यात येत आह़े पावसामुळे व्यत्यय आल्याने पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत असल्याने येत्या काही दिवसात खड्डे बुजविण्यासाठी काय घडामोडी घडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आह़े