नर्मदेचा १६ कि.मी.चा काठ संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:15 PM2019-03-28T12:15:20+5:302019-03-28T12:15:26+5:30

बॉर्डर मिटिंग : चेकपोस्ट आणि गस्त वाढविणार, निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विविध मुद्यांवर चर्चा

 Narmada is 16 km sensitive | नर्मदेचा १६ कि.मी.चा काठ संवेदनशील

नर्मदेचा १६ कि.मी.चा काठ संवेदनशील

googlenewsNext

नंदुरबार : निवडणूक काळात अवैध मद्य, रेशनसह इतर बाबींची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महाराष्टÑ व गुजरात सिमेवरील नर्मदा काठावरील १६ किलोमिटरच्या परिसरात दोन्ही राज्यांकडून गस्त वाढविण्यात येणार आहे. याबाबत बॉर्डर मिटींगमध्ये नंदुरबार व नर्मदा या दोन्ही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करून निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, गुजरातमधील नर्मदा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आय.के.पटेल, नंदुरबारचे अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, वान्मती सी., निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मोहन वर्दे, परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, गुजरातमधील राजपिपलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र परमार, नंदुरबारचे रमेश पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुका सुरळीतरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने या बैठकीत दोन्ही जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले. दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात चेक पोस्टवर काम करणाºया यंत्रणांनी एकमेकांच्या संपर्कात राहून समन्वयाने काम करण्याचेही निश्चित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले, सिमावर्ती भागातील सर्व चेक पोस्ट, पोलीस ठाण्याच्या सर्व संबधीत अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे. निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागोजागी तपासणी करावी. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलीस विभागाच्या समन्वयाने संयुक्त मोहिम राबवावी. नर्मदा काठावधील १६ किलोमिटरच्या संवेदनशील परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात यावी. वाहनांच्या तपासणीला वेग द्यावा अशा सुचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आय.के.पटेल यांनी देखील दोन्ही जिल्ह्यांमध्ये समन्वय ठेवावा. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मतदान असल्यामुळे मतदानाच्या दिवशी विशेष अलर्ट ठेवावा. सिमेवर तपासणी नाक्यांवर कर्मचारी वाढवावे. बंदोबस्त ठेवतांना सामान्य नागरिक, मतदारांना समस्या, अडचणी येणार नाहीत यादृष्टीने काळजी घ्यावी असेही जिल्हाधिकारी पटेल यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले, जिल्हा लहान असला तरी जिल्ह्याला दोन राज्यांच्या सिमा जुळल्या आहेत. अवैध मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. गुन्हेगारांना पळण्याची संधी मिळू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. महाराष्टÑातील फरार गुन्हेगार गुजरातमध्ये तर तिकडील इकडे पळून येतात. अशा गुन्हेगारांना शोधण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलीस विभागामार्फत संयुक्त मोहिम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Narmada is 16 km sensitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.