नवापूर बर्ड फ्ल्यू पॅटर्न राबवण्याची गरज आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:22+5:302021-01-13T05:22:22+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात फेब्रुवारी २००६ मध्ये सर्वात आधी बर्ड फ्ल्यू लागण झाली होती. नवापूर तालुक्यातील ५२ पोल्ट्री फार्म ...

The Navapur bird flu pattern needs to be implemented | नवापूर बर्ड फ्ल्यू पॅटर्न राबवण्याची गरज आहे

नवापूर बर्ड फ्ल्यू पॅटर्न राबवण्याची गरज आहे

Next

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात फेब्रुवारी २००६ मध्ये सर्वात आधी बर्ड फ्ल्यू लागण झाली होती. नवापूर तालुक्यातील ५२ पोल्ट्री फार्म बर्ड फ्ल्यू संक्रमित झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जयंत गायकवाड यांनी हाय अलर्ट घोषित करून नवापूर परिसरातील १० किलोमीटर परिसर सील करण्यात आला होता. नवापूर तालुक्यातील ५२ पोल्ट्री फार्ममध्ये किलिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. पक्षी नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने सुमारे तीन ते चार लाख पक्षी फार्ममधील कोंबड्या नष्ट केल्या होत्या. साधारण २० ते २५ लाख अंडी नष्ट केली होती. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे करोडो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला होता. ग्रामीण भागातील गावराणी कोंबड्यादेखील नष्ट करण्याचे व सर्व पोल्ट्री फार्म निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. पोल्ट्री व्यवसाय सुरळीत करण्यासाठी साधारण दोन वर्ष लागली होती.

सर्वात आधी पिंपळनेर-नवापूर रस्त्यावरील पोल्ट्रीतून कुत्रे व इतर प्राणी मेलेले पक्षी रस्त्यावर घेऊन आल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले होते. गुजरात राज्यातील सुबीर येथे शबरीकुंभ मेळा सुरू होता. त्याचे वृत्तांकन करण्यासाठी असलेल्या पत्रकारांनी या प्रकाराची विचारणा केल्याने नवापूर पशुसंवर्धन विभागाने पाहणी केली. प्रमाणापेक्षा जास्त पक्षी मरत असल्याचे लक्षात येताच पोल्ट्रीतील कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्याने प्राथमिक लक्षण दिसून आले. त्याचा अहवाल मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असता नवापुरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. नवापुरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाच्या तज्ज्ञांशी संपर्क साधून वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बर्ड फ्ल्यू दरम्यान शासनाची मदत

पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने २० कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती. मोठी कोंबडी ४० रूपये व लहान कोंबडी २० रूपयेप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली. २००६ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात आधी नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने संपूर्ण जगात नवापूर शहर बर्ड फ्ल्यूच्या नावाने ओळखले जात होते.

नवापुरातील अंड्यांना महाराष्ट्र-गुजरात राज्यात मागणी

नवापूर तालुक्यात सध्या १९ पोल्ट्री फार्म असून येथील अंड्यांना महाराष्ट्र राज्यातील नाशिक, मुंबई, धुळे, जळगाव तर गुजरात राज्यातील सुरत, बारडोली, नवसारी, भरूच, वापी शहरात मागणी आहे. कोरोना काळात अंड्यांची मागणी मोठी होती. भावदेखील चांगला होता. परंतु देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने अंड्यांची मागणी व भाव कमी झाले आहेत.

पोल्ट्री व्यावसायिकांनी बर्ड फ्ल्यू होऊ नये म्हणून काय करावे

नवापूर तालुक्यात सध्या १९ पोल्ट्री सुरू आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्रीत स्वच्छता ठेवावी, वेळेवर लसीकरण करावे, पक्ष्यांच्या विष्टेची जागा कोरडी असावी, ओली नसली पाहिजे व जाळीने बंदिस्त असली पाहिजे, विष्टेत पाणी गेल्याने कुजून किडे पडतात. जाळी नसली तर बाहेरील कावळे, बगळे व इतर पक्षी किडे खाण्यासाठी पोल्ट्रीत येतात. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे मत सेवानिवृत्त पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.विनायक गावीत यांनी व्यक्त केले आहे.

बसस्थानक शहराबाहेर केले होते

नवापूर तालुक्यात २००६ साली बर्ड फ्ल्यू संक्रमण झाल्याने नवापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक नवापूर शहराबाहेर नवापूर उपजिल्हा रुग्णालयानजीक करण्यात आले होते. नवापूर रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबे काही दिवस बंद करण्यात आले होते. शहरात इतर वाहनांनाही बंदी करण्यात आली होती.

पक्षी व अंडी कशी नष्ट केली

नवापूर तालुक्यातील पोल्ट्रीतील लाखो पक्ष्यांना किलिंग करून अंडी नष्ट करण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये जेसीबीच्या सहाय्याने ६ बाय १० चे खड्डे करण्यात आले होते. त्यात आधी चुन्याची निवडी, मीठ टाकल्यानंतर पक्षी टाकून त्यावर गॅस हिटरच्या सहाय्याने उष्णता देऊन विषाणू नष्ट करून माती टाकून खड्डे पुरले होते. संपूर्ण पोल्ट्री फार्म निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. मालक व कामगारांना पीपीई किट परिधान करण्याचे आदेश दिले. त्यांच्यापासून इतर नागरिकांना दूर ठेवण्यात आले होते. गेटपासून ते पोल्ट्रीपर्यंत चुन्याची निवडी टाकून फवारणी करण्यात आली होती.

बर्ड फ्ल्यू नियंत्रणासाठी विविध राज्यातील तज्ज्ञ आले

नवापूर तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी आले होते. तसेच भोपाळ, दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक येथील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Web Title: The Navapur bird flu pattern needs to be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.