नवापूर बसस्थानकावर रात्रीच्या दरम्यान महिला प्रवाशांना भीती वाटते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:57+5:302021-09-15T04:35:57+5:30
खानदेशातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, सर्व बस नवापूर बसस्थानकावरून रवाना होत असतात. बस न मिळाल्याने प्रवाशांना ...
खानदेशातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून, सर्व बस नवापूर बसस्थानकावरून रवाना होत असतात. बस न मिळाल्याने प्रवाशांना नवापूर बसस्थानकावर रात्री-अपरात्री थांबावे लागते. अशावेळी बसस्थानक परिसरामधील लाईट व स्वच्छतागृह बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली.
मुंबईतील साकीनाका भागातील महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नवापूर बसस्थानकातील अंधकार सध्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा आहे. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानक परिसरात गस्त घालण्याची गरज आहे.
रात्रीच्या दरम्यान बसस्थानकात पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे.
बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच बसस्थानक परिसरात खड्ड्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बसस्थानकातील असुविधा सध्या प्रवाशांची डोकेदुखी ठरली आहे. नवापूर बसस्थानकावरील प्रवाशांमधील असुरक्षिततेची भावना नवापूर आगार व्यवस्थापक व नवापूर पोलीस प्रशासन दूर करतील का असा सवाल उपस्थित होत आहे.
नवापूर बसस्थानकावर रात्री भीती वाटते
नंदुरबारहून परिवारासह वापी जाण्यासाठी निघाले व नवापूर बसस्थानकावर गुजरातकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. नवापूर बसस्थानकातील परिसरात प्रचंड अंधार आहे. रात्री या ठिकाणी खूप भीती वाटते. परिसरामध्ये लाईट लावावी तसेच बसस्थानक स्वच्छ ठेवावे.
कल्याणी शहा, महिला प्रवासी नंदुरबार
रात्री शौचालय बंद असल्याने प्रवाशांचे हाल
नवापूर बसस्थानकावरील सुलभ शौचालय संध्याकाळी सात वाजेला बंद होत असल्याने रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाॅशरुममध्ये जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. काहीवेळा प्रवासी बाहेरच टॉयलेट करत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी व रोगराई पसरत आहे. यासंदर्भात सुलभ शौचालय रात्रीच्या वेळीदेखील उघडे असावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
तीन आठवड्यापासून लाईट बंद, दुरुस्ती केली जाईल
नवापूर बसस्थानकावर तीन आठवड्यापासून लाईट बंद आहेत. बसस्थानकामधील चार लाईट, बाहेरील पाच फोकस व लाईट बंद असल्याने परिसरात अंधार निर्माण झाला आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळवले आहे. त्यांनी पत्रव्यवहार केला आहे. कारागीर आल्यावर दुरुस्ती केली जाईल.
दिलीप गावीत, कर्मचारी, नवापूर, आगार