नवापुरात मोकाट गुरांनी केले शहरवासीयांना हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 01:19 PM2020-12-11T13:19:55+5:302020-12-11T13:20:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. ही गुरे रस्त्यावरच ठिय्या ...

In Navapur, Mokat cattle harassed the city dwellers | नवापुरात मोकाट गुरांनी केले शहरवासीयांना हैराण

नवापुरात मोकाट गुरांनी केले शहरवासीयांना हैराण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट गुरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. ही गुरे रस्त्यावरच ठिय्या मांडत असल्याने अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. नवापूर शहरातील गांधी पुतळ्यापासून दिवंगत हेमलता वळवी यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या सुमारास संपूर्ण रोड गुराने व्यापलेले असतो.
या समस्येकडे पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. मोकाट गुरांबाबत अनेक तक्रारी नगरपालिकेत देण्यात आल्या आहेत. परंतु त्यावर काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. मोकाट गुरांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. शहरात यापूर्वी कॉलेजरोड, लिमडावाडी, लाइट बाजार, सराफ गल्ली येथे रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या मोकाट गुरांमुळे दुचाकीस्वारांना भविष्यात आपले जीवही गमवावे लागले आहेत. बसस्थानक येथे ठिय्या मांडून बसलेल्या गुरांना वाहनचालक थांबवून त्यांना रस्त्यावरून बाजूला करत असतात.
मोकाट गुरांबाबत केवळ प्रशासनाकडे बोट दाखवता येत नाही. याप्रश्नी गुरांचे मालकच अधिक बेजबाबदारपणे वागत आहेत. गुरांच्या मालकांनी गुरांना मोकाट सोडले नाही तर त्यांच्यामुळे उद् भवणाऱ्या समस्या कमी होतील. वाहनाच्या धडकेत गुरांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू शकते. रात्रीच्या वेळी काळोखात रस्त्यावर उभी असणारी गुरे पटकन दिसत नाहीत. अवजड वाहनांच्या धडकेत गुरांवर वेळीच उपचार होत नाहीत. त्यामुळे गुरांचा जीव जाऊ शकतो. मोकाट गुरांबाबत आणखी एक समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करत आहे. ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्याने त्यांचा होणारा मृत्यू. तसेच कचराकुंडी शेजारी तर मोकाट गुरे आणि भटके श्वान हमखास दिसून येतात. रात्री-बेरात्री दुचाकीस्वार किंवा वाटसरूंच्या मागे लागत हे श्वान मोठ्याने भुंकत पाठलाग करतात. वारंवार निदर्शनास आणूनही यांचा बंदोबस्त केला जात नसल्यामुळे गुरांच्या कळपाप्रमाणे त्यांना पकडणारे कर्मचारीही दुर्लक्ष करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक व नागरिकांतून उमटत आहे.

पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करा
गुरे तासान् तास सार्वजनिक ठिकाणी बसलेली असतात. त्यांच्या मल-मूत्रामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला  आहे. तर मल-मूत्रावरून वाहन घसरून अपघात घडण्याचही प्रकार येथे   घडतात, असे काही वाहनचालकांनी सांगितले. दरम्यान, ही जनावरे काही लोकांच्या मालकीची असतात. त्यामुळे पालिकेने त्यांना पकडून शहराबाहेर  कोंडवाडे तयार करून त्याठिकाणी रवानगी करावी. मोकाट गुरांच्या  बाबतीत स्थानिक नगरसेवकदेखील उदासीन आहेत. नगरसेवकांनी नागरी समस्या सोडण्यासाठी तत्पर असणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Web Title: In Navapur, Mokat cattle harassed the city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.