नवापुराची निवडणूक नाईक परिवाराभोवतालीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:35 PM2020-01-09T12:35:14+5:302020-01-09T12:35:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : जिल्हा परिषदेच्या दहा पैकी पाच व पंचायत समितीच्या वीस पैकी ११ जागा जिंकूप कॉग्रेसने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : जिल्हा परिषदेच्या दहा पैकी पाच व पंचायत समितीच्या वीस पैकी ११ जागा जिंकूप कॉग्रेसने तालुक्यात गड राखला आहे. दिग्गजांचा जय-पराजय या निवडणूकीत लक्षवेधी ठरला़
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकुण ३० जागांसाठी मंगळवारी झालेल्या मतदानाची मोजदाद पालिकेच्या बहुउद्देशिय नगरभवनात बुधवारी झाली. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरु झाली़ ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे दोन पुत्र निवडणुकीत उभे होते. दोघांच्या विजयाचे आकडे सर्वप्रथम सार्वजनिक झाले. अजित नाईक यांनी तालुक्यात क्रमांक एकचे सहा हजार ७५० एवढे मताधिक्य घेउन उमराण गटात विजय मिळविला. शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन व युवक कॉग्रेसच्या विविध पदांवरुन अजित नाईक यांनी केलेले कार्य त्यांच्या उपयोगी पडले. त्यांच्या प्रचाराची नियोजनबध्दता त्यांना क्रमांक एकचे मताधिक्य मिळवुन देण्यासाठी साह्यभुत ठरली. मधुकर उर्फ दिपक सुरुपसिंग नाईक यांनी भरडु गटातुन विजय मिळविला. त्यांचे मताधिक्य दोन हजार ६६१ राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन म्हणुन त्यांनी केलेले कार्य पाहता नवख्या मतदार संघातुनही त्यांना विजय मिळाला. भाजपामधून लढत देत गावीत दाम्पत्यही विजयी ठरले. भरत माणिकराव गावीत व संगिता भरत गावीत अनुक्रमे रायंगण व करंजी बुद्रुक गटातुन विजयी ठरले. भरत गावीत यांना तालुक्यात क्रमांक तीनचे पाच हजार ९६७ इतके मताधिक्य मिळाले. त्यांच्या पत्नी संगिता भरत गावीत या क्रमांक दोनचे सहा हजार २५२ इतके मताधिक्य घेउन विजयी ठरल्या.
कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांचा खांडबारा गटात निसटता पराजय झाला. ३१७ मतांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे धरमसिंग ईजा वसावे हे विजयी झाले़ विसरवाडीचे सरपंच बकाराम फत्तेसिंग गावीत यांना चितवी गटातुन पराभवाचा सामना करावा लागला.राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सुरुपसिंग गावीत यांनी त्यांचा पराभव केला़ या गटात अपक्ष बिपीन कैलास गावीत यांनी कडवी झुंज दिल्याने तिहेरी लढत झाली. बिलमांजरे गटातून दिलीप आरजु गावीत यांचा कॉग्रेसचे राया देवजी मावची यांनी पराभव केला़
तालुक्यात पंचायत समितीवर पुन्हा सत्ता हस्तगत करण्यात कॉग्रेसला यश मिळाले आहे. वीस पैकी दहा जागांवर स्पष्ट विजय व तर झामणझर गटात समर्थन दिलेल्या अपक्ष उमेदवार अरशिंता उदेसिंग गावीत यांच्या विजयामुळे काँग्रेसने बहुमत प्राप्त करत सत्ता प्राप्त केली आहे़ पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉग्रेसला पाच व भाजपाला चार जागांवर विजय मिळवता आला आहे़
करंजी बुद्रुक गटात झालेल्या मतदानापैकी ५९ मते गणनेत कमी निघालीत. त्या मतदारांनी उमेदवार व नोटा या विकल्पाऐवजी शेवटचे एन्ड बटन दाबल्याने ती मते गणनेत आलीच नाहीत. उमेदवार व समर्थकांकडुन हा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर निवडणुक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी त्यांना मतदारांकडुन अनावधानाने झालेल्या तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले.