अतिक्रमण काढलेल्या जागेवर उपाययोजनांची गरज : शहादा पालिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:33 PM2017-12-26T12:33:36+5:302017-12-26T12:33:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढलेल्या जागेवर पालिका प्रशासनाने अजून कोणताही प्रकल्प न राबविल्याने तसेच अतिक्रमणधारकांना पालिकेने अद्याप पर्यायी जागा न दिल्याने तेथे पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्यास अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने केलेला प्रचंड खर्च पाण्यात जाणार असल्याचे मोकळ्या झालेल्या या जागेवर पालिकेने पार्कीग झोन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहादा शहरात विशेषत: बसस्थानक परिसरात रहदारीची समस्या गंभीर झाली आहे. बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली होती. रहदारी सुरळीत होण्यासाठी पालिकेने दिवाळीपूर्वी मोठा फौजफाटा घेवून बसस्थानक परिसर व डोंगरगाव रोडवरील अतिक्रमण काढले होते. या भागातील अतिक्रमण काढले गेल्याने रस्ते मोकळे झाल्यामुळे ब:याच प्रमाणात रहदारी सुरळीत झाली असली तरी शहरात कुठेही पार्क्ीग झोन नसल्याने संपूर्ण शहरभर जागा मिळेल तेथे वाहने उभी राहत असल्याने रस्त्यात उभ्या राहणा:या या वाहनांमुळे रहदारीची कोंडी होते. वाहनचालक सर्रास तहसील कार्यालय, नगरापालिका, बसस्थानक परिसरात वाहने उभी करतात. शहरात कुठेही पार्कीग झोन नसल्यामुळे पार्क्ीगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकरीता शहरात विशेषत: बसस्थानक परिसरात पार्क्ीग झोन तयार करणे आवश्यक आहे. बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी पालिकेने तेथील अतिक्रमणे काढून जागा मोकळी केली होती. परंतु त्यानंतर लगेचच ती जागा ताब्यात घेवून तेथे पालिकेने कोणताही प्रकल्प न राबविल्यामुळे तसेच तेथील अतिक्रमीतांना व्यवसायासाठी पर्यायी जागा न दिल्याने त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होवून रहदारीची समस्या ‘जैसे थे’ होवू शकते. त्यामुळे पालिकेने आता अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर त्वरित पार्क्ीग झोन तयार करणे आवश्यक आहे. बसस्थानकाजवळील या मोकळ्या जागेवर पार्कीग झोन झाल्यास शहरातील पार्कीगची मोठी समस्या सुटून तेथे अतिक्रमणाची समस्याही कायमची निकालात निघेल.