तापी काठावर तीन बचाव बोटींची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:15 PM2018-05-27T13:15:27+5:302018-05-27T13:15:27+5:30
नंदुरबारात पूर रेषेतील गावांचा नव्याने सव्र्हेच नाही
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि़ 27 : पूर रेषेतील गावांचा नव्याने सव्र्हेच झालेला नसल्यामुळे वर्षानुवर्ष तेच ते 29 गावे प्रशासनाकडून पुढे आणली जातात. या गावांमध्ये नेहमीच्या उपाययोजना यंदाही राहणार आहेत. दरम्यान, जिल्ह्याला दोन बोटी उपलब्ध होत्या. पैकी एक खराब झाली असून एक नागन प्रकल्पाच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे तापी काठावरील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजच्या ठिकाणी बोटीच नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दहा वर्षापूर्वी झालेली अतिवृष्टी आणि तापी व तिच्या उपनद्यांना आलेला महापूरात मोठी वित्तीय हाणी झाली होती. चार ते पाच दिवस जनजीवन विस्कळीत झाले होते. तेंव्हापासून पूर रेषेतील गावांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत असते. परंतु जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या काठावरील गावांचे नव्याने सव्रेक्षणच झालेले नाही. पूर्वीपासूनच 29 गावांवर लक्ष केंद्रित राहत आहे. त्याच त्या उपाययोजनादेखील राहत आहेत.
यंदा आपत्ती निवारण कक्षाला नवीन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. ते त्या त्या तहसील कार्यालयांना आणि पालिकांना वितरीत करण्यात आले आहेत. विशेषत: तापी काठच्या गावांना आणि सातपुडय़ातील उतारावरील नदीकाठच्या गावांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे विविध 36 प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. त्यातील काही साहित्य हे सहा तहसील कार्यालये व चार नगरपालिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्यात लाईफबॉय ग्रीन, सर्च लाईट, रोप, मनीका रोप, मेगा फोन, अंडरवॉटर टॉर्च, गमबूट, गॅस लॅम्प, लाकूड व लोखंड कापण्याचे कटर यासह इतर साहित्याचा समावेश आहे. काही अत्याधुनिक साहित्यदेखील उपलब्ध आहे. बचाव पथकाचे एकूण 36 सदस्य आहेत. ते सर्व पोलीस दलातील आहेत. या पथकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय नर्मदा विकास विभागाकडेदेखील बचाव पथक आणि नावाडी आहेत. त्यांचाही पर्यायी स्थितीत उपयोग करून घेतला जाणार आहे. याशिवाय सर्व तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर उपलब्ध आहेत. त्यांच्याकडून लागलीच माहिती उपलब्ध होणार आहे.रेड लाईन अर्थात लाल पट्टय़ातील गावांमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या गावांची संख्या 29 असून त्यात शहादा तालुक्यातील 18 तर नंदुरबार तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासखेडा, नांदरखेडा, प्रकाशा या गावांचा समावेश आहे. तर नंदुरबार तालुक्यातील सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदा, आमळथे, ओसर्ली, खापरखेडा, ओसर्ली आणि कोपर्ली या गावांचा समावेश आहे.स्काय लाईन अर्थात निळ्या रेषेअंतर्गत जिल्ह्यात एकही गाव नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. स्काय लाईन म्हणजे नदीला थोडाजरी पूर आला तरी ते पाणी गावात घुसण्याची शक्यता असते, असे गाव जिल्ह्यात एकही नाही. त्यामुळे रेड लाईनवरील गावांवरच प्रशासन नजर ठेऊन असते. त्यासाठी सर्वत्या उपाययोजना केल्या जात असतात. अती पूर आला तरच रेड लाईनमधील गावांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते असे प्रशासनाचे म्हणने आहे. तोर्पयत प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळत असतो. शिवाय अशा गावांमधील तलाठी, पोलीस पाटील आणि इतर आवश्यक लोकांचे मोबाईल नंबरही उपलब्ध आहेत.एका बोटींची अवस्था अतिशय खराब आहे. यापूर्वी दोन बोटी होत्या. आता एकच आहे. आणखी एक खरेदीसाठी प्रस्ताव आहे. प्रात्यक्षिकांसाठी या बोटींचा उपयोग केला जातो. पाटबंधारे विभागाने आधुनिक बोटींची व्यवस्था करणेदेखील अपेक्षीत असल्याचे बोलले जात आहे. बारा वर्षापूर्वी तापीला आलेल्या महापुरात अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले होते. त्यावेळी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे बारा वाजल्याचे दिसून आले होते. पूर काठावरील ग्रामस्थांना प्रशिक्षण नाही या बाबी उघड झाल्या होत्या.