नवापूरात आंतरराष्ट्रीय परिषद : आदिवासी हेच या जगाचे खरे रहिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:32 PM2018-01-06T12:32:44+5:302018-01-06T12:32:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : जागतिक पातळीवर आदिवासी समाजाचा मोठा हिस्सा सांस्कृतिक स्तरावर संपन्न आहे. असे असतांनाही हा वर्ग मुख्य प्रवाहापासुन दुर असल्याचे मत आमदार सुरूपसिंग नाईक यांनी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत बोलतांना व्यक्त केले.
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर आयोजित परिषदेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष नाईक यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. देवरे, नागपूरचे डॉ. मोहन काशिकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील, संस्थेचे मानद सचिव अजित नाईक, तानाजीराव वळवी, सहसचिव मधुकर नाईक, अजय पाटील, संचालक विनोद नाईक, जी. के. पठाण, अमृत पाडवी, डॉ. शुभदा ठाकरे, नेपाळच्या डॉ. इंद्रा अधिकारी, डॉ. निर्मला उपरेती, बांगलादेशचे डॉ. खसरुल आलम कुद्दुसी काझी व्यासपीठावर उपस्थित होते.
आदिवासी समाजाच्या विकासाचे चित्र जागतिक संशोधनाचा विषय झाला आहे याचे समाधान असल्याचे सांगून आमदार नाईक पुढे म्हणाले, आदिवासी हे या जगाचे खरे रहिवासी आहेत. जगाच्या लोकसंख्येचा मोठा भाग त्यांनी व्यापला असल्याचे ते म्हणाले. शिरीष नाईक यांनी पर्यावरण पुरक सांस्कृतिक ठेवा जतन करूनही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासुन आजही लांब असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. मोहन काशिकर यांनी सांगितले, भारताचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण अनेक अंगांनी सातत्याने बदलत आहे.
आधुनिक काळात बदलती परिस्थिती लक्षात घेता घटनात्मक बदल अपेक्षित असल्याचे सांगून बदलाची ही प्रक्रिया स्थानिक पातळीवरुन झाल्यास राजकारणात सकारात्मक बदल शांततेत घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आधुनिक काळात सध्याच्या शासनाने क्रांतीकारक बदल सुचवून विकासाचे धोरण लाऊन धरले असले तरी गत 60 वर्षाचा विकासाचा पाया विसरुन चालणार नाही असे डॉ. पी. डी. देवरे यांनी सांगितले. नवापूर तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी जनतेचा झालेल्या विकासात अधिकची भर टाकण्याची गरज व्यक्त करतांना विकासाची ही गरज अविकसित भागासाठी आवश्यक असल्याचे मत डॉ. गिरीष राणा यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी परिषदेत सादर झालेल्या संशोधन पेपरचे संकलन केलेले ट्रायबल कम्युनिटी अॅण्ड सोशियो पॉलिटीकल थॉट, रिसेंट पॉलिटीकल डेव्हलपमेंट इन इंडिया, परिषद स्मरणिका व विचार मंथन या चार पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. ए. जी. जयस्वाल यांनी प्रास्तविक करुन अतिथींचे स्वागत केले. स्वागतपर मनोगत परिषदेचे संयोजक उपप्राचार्य ए. बी. महाजन यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन डॉ. आय. जी. पठाण व प्रा. सुरेखा बनसोडे यांनी केले. उपप्राचार्य प्रा. वाय. जी. भदाणे यांनी आभार मानलेत.