कोठार आश्रमशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:36 AM2021-09-24T04:36:21+5:302021-09-24T04:36:21+5:30
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून विद्याभारती देवगिरी प्रांत नंदुरबार जिल्हा प्रचारक मंत्री मुक्ता पाटील उपस्थित होत्या. कार्यशाळेत जोशी यांनी ...
कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून विद्याभारती देवगिरी प्रांत नंदुरबार जिल्हा प्रचारक मंत्री मुक्ता पाटील उपस्थित होत्या. कार्यशाळेत जोशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० विषयी माहिती दिली. शैक्षणिक धोरणात वय तीन, पाच व आठव्या इयत्तेसाठी खुले शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, प्रौढ साक्षरता आणि जीवन समृद्ध करणारे कार्यक्रम या मार्गाने हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सुमारे दोन कोटी शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात आणली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारत केंद्रित शिक्षण सामान्यपणे मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. तिसऱ्या वर्गात जाणाऱ्या मुलाला काय आलं पाहिजे. अनुभवातून शिक्षण चित्रातून वाचन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर गीते, आनंददायी शिक्षण संकल्पना विकसित करण्यासाठी जोर दिला जाणार असल्याची माहिती जोशी यांनी कार्यशाळेत दिली.
कार्यशाळेला कोठार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, माध्यमिक मुख्याध्यापक सी.एम. पाटील, ज्येष्ठ शिक्षक हरी भारती, भूषण येवले, मनोज चिंचोले, निंबा रावळे, कीर्तिकुमार वाणी, नीता गुरव, शालिग्राम वाणी, योगेश चव्हाण, जितेंद्र चौधरी, पन्नालाल पावरा, ब्रह्मराज नाईक, अजय पवार यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन हंसराज महाले यांनी केले.
भाषिक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण देण्यावर भर आहे. त्यासाठी अभ्यासक्रमांमध्ये विविध संकल्पना स्पष्ट करण्यासाठी व अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यासाठी विविध खेळांच्या तसेच कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. विविध संकल्पना स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीला अनुसरून कोणत्या प्रकारे अध्यापन करावे इत्यादी बाबींचे प्रात्यक्षिक मार्गदर्शक शैलेश जोशी यांनी कार्यशाळेत प्रात्यक्षिकासह करून दाखवले. विद्यार्थ्यांना वाचन करताना त्याच्या सभोवताली असणाऱ्या वस्तू दाखवून संबोध स्पष्ट करावा. त्याचप्रमाणे गणिती प्रक्रिया समजावत असताना विविध कृती व खेळ राबवून त्या सोप्या पद्धतीने समजावून सांगणे इत्यादी बाबी उदाहरण व प्रात्यक्षिकांद्वारे सहभागी शिक्षकांना स्पष्ट करून सांगितले. या प्रात्यक्षिकांमध्ये शाळेतील शिक्षकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.