माजी नगराध्यक्षंसह नऊ जणांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:56 AM2019-03-17T11:56:30+5:302019-03-17T11:56:55+5:30
तळोदा पिपल्स सोसायटी वाद : मुख्याध्यापकांना घरात घुसून मारहाणीचे प्रकरण
नंदुरबार : शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत वादात मुख्याध्यापक पदाचा पदभार घेण्याच्या कारणातून घरात घुसून हल्ला करणाऱ्या नऊ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली. शिक्षा झालेल्यांमध्ये तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे.
तळोदा येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा १२ वर्षांपासून संस्थेचा ताबा घेण्यावरून वाद सुरू होता. मे २०१० मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी प्रभाकर चौधरी यांना अध्यक्ष म्हणून घोषीत केले होते. त्यानुसार चौधरी यांनी किशोरसिंग गुलाबसिंग परदेशी यांना पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती दिली होती. दुसऱ्या गटाचे जितेंद्र लक्ष्मण माळी व इतरांना ते मान्य नव्हते. या वादातून १२ मे २०१० रोजी किशोरसिंग गुलाबसिंग परदेशी यांच्या तळोदा येथील घरात घुसून जमावाने त्यांना मारहाण केली होती. तलावारीनेही वार केले होते. महिलांच्या गळ्यातून साडेपाच तोळ्याचे मंगळसूत्र देखील जबरीने चोरल्याची फिर्याद किशोरसिंग परदेशी यांनी तळोदा पोलिसात दिली होती.
त्यावरून जितेंद्र लक्ष्मण माळी, पंकज भालचंद्र राणे, निलेश धर्मदास माळी, गौतम आत्माराम शिरसाठ, सुशिल लक्ष्मण माळी, कुलदिप रमण राणे, विनोद रमण राणे, कल्पेश धर्मदास माळी, भरत बबनराव माळी, लक्ष्मण बबनराव माळी, सुजीत लक्ष्मण माळी, तुषार सुनील माळी व संजय बबनराव माळी यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून पोलीस उपअधीक्षक एम.डी.आत्राम यांनी शहादा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायायाधिश पी.बी.नायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला चालला. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे लक्षात घेता शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून फौजदार रामलाल साठे, हवालदार रवींद्र माळी होते. तपास अधिकारी, सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित यांनी अभिनंदन केले.