पाच तालुक्यांनी केली पावसाची नव्वदी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:22 PM2019-08-11T12:22:49+5:302019-08-11T12:26:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी नव्वदी पार केली आहे. तळोदा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात यंदा जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी पावसाची सरासरी नव्वदी पार केली आहे. तळोदा व नंदुरबार तालुका तर पुर्ण 100 टक्केच्या घरात आहेत. 25 वर्षानंतर प्रथमच एवढा पाऊस झाला आहे. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यात सरासरीचा केवळ 79 टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत. आता हे पाणी पुढील पावसाळ्यार्पयत सांभाळून वापरणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात गेल्या 25 वर्षानंतर प्रथमच एवढा पाऊस झाला. यापूर्वी देखील जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. परंतु सर्वच भागात पावसाचा जोर नव्हता. केवळ काही महसूल मंडळे किंवा तालुक्यापुरती त्याची मर्यादा राहत होती. यंदाचा पाऊस जिल्हाभरात सर्वत्र कमी अधीक प्रमाणात सारखाच कोसळला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या अवघ्या सव्वादोन महिन्यातच सरासरीच्या 90 टक्केर्पयत पाऊस गेला आहे.
तळोदा तालुक्यात सरासरीच्या ुतुलनेत सर्वाधिक 98.45 टक्के पाऊस झाला आहे. त्या खालोखाल नंदुरबार तालुक्यात 96.83 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. धडगाव तालुक्यात 93.58 टक्के, नवापूर तालुक्यात 93.48 टक्के, शहादा तालुक्यात 92.12 टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पाऊस अक्कलकुवा तालुक्यात 78.62 टक्के झाला आहे. जिल्ह्यात आतार्पयत सरासरीच्या तुलनेत 88.66 टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्याची पावसाची सरासरी 835.83 मि.मी.आहे. त्या तुलनेत आतार्पयत 741.01 मि.मी.पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील 37 लघु व चार मध्यम प्रकल्प तुडूंब भरले आहेत.
विरचकची टक्केवार पाच टक्क्यांनी घटली.. विरचक प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी 82 टक्के पाणीसाठा होता. परंतु पाटबंधारे विभागाने प्रकल्पातील सहा हजार क्यूसेक पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्पातील पाणीसाठा 77.63 टक्केवर आला आहे. असे असले तरी प्रकल्पात शिवण नदीतून पाण्याची आवक सुरूच आहे. पावसाळ्याचा आणखी दीड ते दोन महिना बाकी असल्यामुळे या काळात प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरू शकेल असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.