"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका
By मनोज शेलार | Published: August 12, 2022 08:07 PM2022-08-12T20:07:15+5:302022-08-12T20:07:53+5:30
Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.
- मनोज शेलार
नंदुरबार : मनापासून एकत्र न येता केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्यावर काय होते हे भाजप-शिंदे गटाच्या सरकारच्या काराभारावरून लक्षात येते. ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही अशी परिस्थिती आहे. स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कॉंग्रेसतर्फे नंदुरबारात पदयात्रा काढून मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, शिवसेनेने काँग्रेससोबत चर्चा करणे आवश्यक होते. या पदासाठी कॉंग्रेसचीही मागणी होती. परंतु शिवसेनेने परस्पर निर्णय घेतला. आघाडी असताना ही बाब खटकणारी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रथमच बिनखात्याचे मंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करणार आहेत तर अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना झेंडावंदन करावे लागणार आहे. राज्य सरकार अस्तित्वात असताना अशी वेळ येणे ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.