जयनगर सरपंचांविरुद्धचा अविश्वास ठराव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:18+5:302021-07-18T04:22:18+5:30
तालुक्यातील जयनगर येथील लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची निवडणूक गेल्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. लोकनियुक्त सरपंचपदी मीनाबाई अंकुश सोनवणे ह्या ...
तालुक्यातील जयनगर येथील लोकनियुक्त सरपंच व सदस्यांची निवडणूक गेल्या दोन वर्षांपूर्वी झाली होती. लोकनियुक्त सरपंचपदी मीनाबाई अंकुश सोनवणे ह्या विजयी झाल्या होत्या. सदस्य म्हणून सुनील विठ्ठल माळी, छगन राम पारधी, धनराज हंडू नगराळे, कोकिळा तुकाराम पारधी, झिंगाबाई कचरू भिल, धुपीबाई खंडू भिल, निर्मलाबाई सुदाम माळी, लालची चंद्र भिल व मनीषा महेंद्र शिंपी हे विजयी झाले होते. सरपंचपदानंतर दीड वर्षाच्या कार्यकाळानंतर सरपंच मीनाबाई सोनवणे ह्या गावातील विकास कामे करताना सदस्यांना विश्वासात घेत नाहीत व विकास कामांबाबत ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करीत नाही आदी कारणे देऊन ग्रामपंचायत सदस्य छगन रामू पारधी यांनी १२ जुलै रोजी शहादा तहसीलदार यांच्याकडे सरपंचांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव अर्ज सादर केला होता. या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १६ जुलै रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीला सरपंच मीनाबाई सोनवणे यांच्यासह सर्वच सदस्य उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांनी उपस्थित सदस्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली. या वेळी सदस्यांनी मते मांडली. ग्रा.पं. सदस्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९७५ च्या कलम ३५ (३) अन्वये पंचायतीच्या सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांच्या एकूण संख्येनुसार बहुमताने अविश्वास ठराव मंजूर होणे आवश्यक आहे. या ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या १० असून अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्यासाठी १० पैकी आठ सदस्यांचे अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान होणे आवश्यक होते. मात्र घेण्यात आलेल्या मतदानात ठरावाच्या बाजूने सात तर ठरावाच्याविरुद्ध तीन असे मतदान झाले. म्हणून सरपंच मीनाबाई अंकुश सोनवणे यांच्यावरील अविश्वास ठराव रद्दबातल करण्यात आला. या वेळी किरण साळवे व ग्रामसेवक केशव वसावे उपस्थित होते.