पपई पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या ना ना क्लृप्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 12:59 PM2020-12-03T12:59:20+5:302020-12-03T12:59:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. सद्य:स्थितीत दिवसा काही प्रमाणात उन्हाळा तर रात्री थंडी जाणवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
तळोदा तालुक्यातील नवागाव, चिनोदा, प्रतापपूर, रांझणी, मोड, बोरद परिसरात पपईचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु असमतोल वातावरणामुळे पपई पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पपई लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यात पपई रोपे, लागवड खर्च, विविध खते, महागडी फवारणी आदी खर्च होत असतो. त्यामुळे पपईवर लागवडीपासून ते काढणीपर्यत लक्ष देणे आवश्यक असते. पपईला उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. पपईला कडाक्याची थंडी मानवत नाही. तर ज्या भागात भरपूर पाऊस पडतो अशा भागात पपईची लागवड यशस्वी होत नाही. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव, धुके या पिकास हानीकारक असते. म्हणून या पिकावर थंडीचा व जास्त उन्हाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सद्य:स्थितीत रांझणी परिसरातील शेतकऱ्यांकडून क्राँप कव्हरचा उपयोग करण्यात येत आहे.
क्राँप कव्हर हे उन्हाळा व हिवाळ्यात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे रासायनिक फवारणी कमी लागते. शिवाय सनबर्न म्हणजे जास्त उन्हापासून फळांचे संरक्षण होते. तर यामुळे पपई पिकांच्या फळांचा रंग व आकार +चांगला येण्यासाठी मदत होते. तसेच थंडीपासून पपईला संरक्षण मिळते व जास्त उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पपई फळांचा दर्जा टिकून ठेवत उत्पन्न चांगले येत असल्यामुळे तालुक्यातील शेत शिवारात पपई उत्पादक शेतकऱ्यांकडून पपईसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.