नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 12:03 PM2020-12-21T12:03:59+5:302020-12-21T12:04:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वसाहतींची संख्याही वाढत आहे. अ वर्ग नगरपालिका असलेले ...

No water, no roads in the new colony! | नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

नववसाहतीत ना पाणी, ना धड रस्ते !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वसाहतींची संख्याही वाढत आहे. अ वर्ग नगरपालिका असलेले नंदुरबार काही वर्षात ड वर्ग महानगरपालिका होऊ शकेल अशी स्थिती आहे. वाढती लोकसंख्या, वाढत्या वसाहती यामुळे सुविधा पुरवितांना काही प्रमाणात पालिकेची कसरत होते. दुसरीकडे शहरालगतच्या परंतु ग्रामिण क्षेत्रात मोडणाऱ्या वसाहतींना तर कुणीही वाली नाही अशी स्थिती आहे. 
नंदुरबारची लोकसंख्या दीड लाखाच्या वर आहे. वसाहतींची संख्या १०० पेक्षा अधीक आहे. गेल्या तीन ते चार वर्षात नवीन तब्बल २५ पेक्षा अधीक वसाहती वसल्या आहेत. याशिवाय लगतच्या खेड्यातील अर्थात दुधाळे, पातोंडा, होळ, वाघाळे, चौपाळे, नळवा, टोकरतलाव क्षेत्रात देखील १०० पर्यंत नवीन वसाहती वसल्या आहेत. शहरी हद्दीत असलेल्या वसाहतींना किमान पाणी, रस्ते, पथदिव्यांची सोय होत आहे. परंतु ग्रामिण क्षेत्रात येणारऱ्या वसाहतींना मात्र अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबधीत ग्रामपंचायतींचे उत्पन्न जेमतेम त्यात एवढ्या मोठ्या वसाहतींना सुविधा पुरविणे शक्य होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अशा वसाहतींमधील नागरिकांना धड रस्ते नाही, पाणी पुरवठा नाही अशी स्थिती आहे. नंदुरबार पालिकेने अशा वसाहतींना पालिका हद्दीपर्यंत जोडरस्ते तयार करून दिले आहेत. तेथपर्यंत पथदिवेही लावून दिले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात सुविधा असली तरी अंतर्गत भागात मात्र समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

रस्ता, वीज, पाण्याच्या समस्या कायम...
शहरालगतच्या नवीन वसाहतींमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात अशा ठिकाणी चिखलातून जावे लागते. विद्युत रोहित्र देखील पुरेशा क्षमतेचे नसल्यामुळे विजेचीही समस्या कायम असते. ग्रामिण फिडर असल्यामुळे काही वेळा लोडशेडिंगलाही सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्याची मात्र गंभीर समस्या आहे. उन्हाळ्यात टॅंकर मागवावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात अशा भागात टॅंकर व्यवसाय तेजीत असतो. आरोग्याची समस्या देखील मोठी आहे. गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे डास, मच्छरांचा प्रादुर्भाव होतो. पथदिव्यांअभावी वसाहतींमध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण असते.

मोठ्या हौसेने घर बांधले, परंतु गेल्या आठ ते दहा वर्षात या वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, गटारी यांचा प्रश्न सुटलेला नाही. ग्रामपंचायतींकडे वारंवार पाठपुरावा केला जातो, परंतु उपयोग नाही. पावसाळ्यात स्वखर्चाने मुरूम आणून तात्पुरता रस्ता करावा लागतो. मुलांना शाळेत सोडण्यासाठी मोठी कसरत असते. उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. 
-नलिनी पाटील, होळ शिवार रहिवासी.

नवीन वसाहतींच्या भागात रस्ते, पाणी व पथदिव्यांची सोय करून द्यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. जिल्हा परिषद किंवा आमदार निधीतून सुविधा पुरवाव्या अशीही मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्याकडे करण्यात आलेली आहे. परंतु कुणीही लक्ष देत नाही. पालिकेने तरी किमान पाण्याची सोय करून द्यावी अशी अपेक्षा आहे.
-राहुल जाधव, दुधाळे शिवार रहिवासी.

Web Title: No water, no roads in the new colony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.