गुजरातमधील कुख्यात गुंडाला नवापूरला अटक स्थानिक पोलीस अनभिज्ञ, एटीएसच्या पथकाने केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:09+5:302021-09-21T04:34:09+5:30
सुरत शहरातील लालगेट पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नोंद असलेला दि गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऑर्गनायझ क्राईम ॲक्टनुसार गुन्हा नोंद ...
सुरत शहरातील लालगेट पोलीस ठाण्यात गुन्ह्यात नोंद असलेला दि गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऑर्गनायझ क्राईम ॲक्टनुसार गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी (रा.रामपुरा पस्तागिया शेरी, लालगेट, सुरत) सुरत येथून पळून जाऊन पश्चिम बंगाल येथे खोट्या नावाने राहत होता. तेथून दोन-तीन महिन्यानंतर महाराष्ट्रातील नवापूर येथे आला होता. त्याच्या तपासासाठी एटीएसचे पोलीस निरीक्षक सी. आर. जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी हा नवापूर शहरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने गुजरात एटीएसच्या टीमने मिळालेल्या माहितीनुसार लपून बसलेल्या त्या जागेवर धाड टाकली. गुजरात एटीएसच्या टेक्निकल तथा ह्यूमन सर्वेलन्स आधारे त्याला पकडण्याचे ऑपरेशन यशस्वी पार पडले.
मोहम्मद अशरफ नागोरी याच्या विरोधात २४ गुन्ह्यांची नोंद आहे.
आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी याला २००३ मध्ये सुरत व अहमदाबाद येथे पोटा अंतर्गत पकडले होते. २०१३ ते २०१५ मध्ये पासा अंतर्गत सुरत पोलिसांनी पकडले होते. २००५ ते २०१० दरम्यान सुरत येथील हसमुख लालवाला यांच्यावर फायरिंग केसमध्ये सात वर्षे शिक्षा झाली आहे. २००३ मध्ये जेहादी गुन्ह्यात पोटा अंतर्गत पकडला होता. या गुन्ह्यात ५४ आरोपींना पकडले होते. यात सात वर्षे शिक्षा झाली आहे.
आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी हा जेहाद कावतरा आणि ११ पिस्टल आर्म्ससारख्या असंख्य गुन्ह्यात पकडला गेला आहे. सध्या आरोपीला तपासासाठी अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत. तपास पूर्ण झाल्यावर सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
आरोपी मोहम्मद अशरफ नागोरी याला सुरत पोलिसांनी २०१९ व २०२० मध्ये तडीपार केले होते.