रेल्वे व बसद्वारे येणारे वाढविताहेत जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:14 PM2020-12-06T12:14:03+5:302020-12-06T12:14:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वे व बस मार्गे प्रवास करून शहरात येणारे प्रवाशांची कुठलीही तपासणी होत नसल्यामुळे यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रेल्वे व बस मार्गे प्रवास करून शहरात येणारे प्रवाशांची कुठलीही तपासणी होत नसल्यामुळे यातील अनेक प्रवासी हे कोरोनावाहक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे ते देखीेल एक कारण मानले जात आहे. गुजरात राज्यातून सर्वाधिक जण जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने त्याचा परिणाम कोरोना संसर्ग वाढीत झाला असल्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतील रेल्वे व बस सेवा सद्या सुरू आहे. या दोन्ही माध्यमातून हजारो प्रवासी दररोज नंदुरबारात व नंदुरबारातून बाहेरगावी जात आहेत. या प्रवाशांची कुठलीही आरोग्य तपासणी बसस्थानक किंवा रेल्वे स्थानकात होत नाही. रेल्वे स्थानकात असलेली तपासणी व्यवस्था अगदीच तोकडी आहे. थर्मलगण द्वारे ताप मोजला जातो. ॲाक्सीमिटर लावण्याची कुणीही तसदी घेत नाही.
या ठिकाणी निर्जंतुकीकरण देखील वेळोेवेळी होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रेल्वेने येणारे प्रवाशांपैकी अनेकजण कोरोना वाहक असण्याची शक्यता आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकात दररोज हावडा, नवजीवन, ताप्तीगंगा या एक्सप्रेस गाड्यांसह साप्ताहिक व स्पेशल रेल्वेगाड्या देखील येत असतात. अगदी उत्तर भारतपासून दक्षिणभारत आणि पूर्वेपासून पश्चिमेकडे या गाड्या धावत असल्याने त्या भागातून येणारे प्रवासी देखील मोठे आहेत. त्यामुळे या प्रवाशांपैकी अनेकजण कोरोना संक्रमीत असू शकतात. तेच जिल्ह्यात कोरोना वाहक असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसात गुजरातमधील सुरत, अहमदाबाद आदी शहरात कोरोना रुग्ण वाढले होते. त्यामुळे त्या भागात काही प्रमाणात लॅाकडाऊनही लागू करण्यात आले होते. परिणामी जिल्ह्यात येणारऱ्या सर्वच सिमेवरील रस्त्यांवर चेकनाके उभारण्यात आले होते. परंतु मणुष्यबळाअभावी ते लागलीच बंद पडले आहेत. त्यामुळे गुजरातमधून तसेच मध्यप्रदेशातून सर्रास आणि कुठलेही निर्बंध न पाळता वाहतूक सुरू आहे.
खाजगी बसेस देखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत आहेत. त्यामुळे कोरोना वाहक अनेकजण जिल्ह्यात फिरत असल्यामुळेच रुग्ण संख्या वाढत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसे झाले तरच बाहेरून येणाऱ्या संसर्गीत रुग्णांना अटकाव करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांचे काय?
मोठ्या शहरात अर्थात विमानतळ असलेल्या शहरात प्रवाशांची तपासणी होते. रेल्वे स्थानकांवर देखील जुजबी तपासणी केली जाते. परंतु बसमधून दररोज येणाऱ्या हजारो प्रवाशांचे काय? हा प्रश्न आहेच. असे प्रवासी बसमध्ये कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. आवश्यक खबरदारी घेत नसल्याची स्थिती आहे.
दिवाळीनंतर रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्ह्यात दिवाळीनंतर तब्बल चारशे रुग्ण आढळले आहेत. त्याआधी दिवासाला पाच ते १५ रुग्ण आढळत होते. दिवाळीनंतर त्यात वाढ होऊन ३० ते ६५ रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यांच्या संपर्कात आलेले व इतर अशी साखळी आता वाढत चालली असल्याची चित्र आहे.