‘ओ शेठ... रस्त्यावर वाढदिवस साजरा कराल तर जाल जेलमध्येच थेट...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:02+5:302021-09-21T04:34:02+5:30
नंदुरबार : ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट...’ म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा जल्लोष करणार असाल, तर सावधान... ...
नंदुरबार : ‘ओ शेठ... तुम्ही नादच केलाय थेट...’ म्हणत जर तुम्ही रस्त्यावरच वाढदिवसाचा जल्लोष करणार असाल, तर सावधान... थेट पोलीस कोठडीचा रस्ता धरावा लागू शकतो. युवकांकडून होणाऱ्या अशा भंपकबाजीला आवर घालण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. सार्वजनिक चौकात, रस्त्यावर धारदार शस्त्रांचा वापर करून वाढदिवस साजरा करताना आढळल्यास ‘बर्थ डे बॉय’ला केक नव्हेल तर पोलीस कोठडीमधील भाकरी खावी लागणार आहे.
सध्या युवकांमध्ये भर रस्त्यावर, चौकात वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढत चालले आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील गल्लीबोळांत, तसेच सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या सुमारास मुलाचा, नेत्याचा किंवा विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या सुरू आहे. भाईगिरीची क्रेझ असलेले युवक तलवार, चाकू, कोयता आदीने केक कापून नेतेगिरीचा आव आणतात. सोबत डीजेच्या आवाजावर थिरकून वाढदिवस साजरा करतात. यामुळे नियमांचे उल्लंघन होते आणि याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे शस्त्रांचा वापर करून किंवा इतर नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असून, भंपकबाजी टाळणे आवश्यक आहे.
सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे वाढतेय फॅड
सोशल मीडिया येण्यापूर्वी काही मोजक्याच क्षेत्रातील व्यक्तींचा, लहान मुलांचा अथवा सधन घरातील अशा व्यक्तींचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात असे.
त्याची चर्चा सर्वत्र व्हायची. मात्र, सोशल मीडियामुळे आता कुणीच मागे राहिले नाहीत.
वाढदिवस हा जीवनातील अविस्मरणीय दिवस समजला जातो. त्यासाठी मित्रांसह आई-वडील, नातेवाइकांचा आशीर्वाद व शुभेच्छांची जोड महत्त्वाची ठरते.
मात्र, आता त्याला फाटा देत वाढदिवस म्हणजे मौजमजा, सेलिब्रेशन, धांगडधिंगा अशा प्रवृत्तीत वाढ होत आहे. विकृत पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे फॅड सध्या जोमात आहे.
....तर गुन्हा होणार दाखल
रस्त्यावर वाहन उभे करून केक कापणे.
केक कापताना तलवार, चाकूसारखे शस्त्र वापरणे.
डीजे-गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे.
भाईगिरीचे भूत असल्याने हा प्रकार सोशल मीडियावर अपलोड करणे.
शांतता भंग करून नागरिकांमध्ये दहशत पसरविणे.
रस्त्यावर दंगा नकोच
शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यांच्या वतीने रात्री विशेष गस्त सुरू असते. त्यात नियंत्रण कक्षात अथवा पोलीस ठाण्यात कोणी कॉल करून तक्रार केल्यासही पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई करतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे महागात पडू शकते.
नंदुरबारात अशा प्रकारच्या कारवाया यापूर्वी झालेल्या आहेत; परंतु त्यांचे प्रमाण कमी आहे. आता काही बाबी लक्षात घेता पोलिसांकडून अशा उत्साही युवकांवर नजर ठेवली जाणार आहे. जर कुणी असे प्रकार करीत असतील तर लागलीच नियंत्रण कक्षाला किंवा जवळच्या पोलीस ठाण्याला संपर्क करावा, पोलीस लागलीच घटनास्थळी येऊन कारवाई करू शकतात.