शहादा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून दीड लाख लांबिवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:22 AM2021-01-13T05:22:27+5:302021-01-13T05:22:27+5:30
नंदुरबार : शहादा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा ...
नंदुरबार : शहादा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, खेतिया येथील पटेल चौक भागात राहणाऱ्या सरला गणेश पटेल या नंदुरबार येथे येण्यासाठी शहादा बसस्थानकात आल्या. सेंधवा-नंदुरबार बस लागल्यावर त्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्याजवळील पर्समधील पाकीट लांबविले. त्यात एक लाख ५७ हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार, सात हजार २०० रुपयांचा मोबाइल आणि तीन हजार ३५० रुपये रोख असा ऐवज होता. बसमध्ये बसल्यानंतर महिलेने पर्समधील पाकीट पाहिले असता ते नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बसमध्ये शोधाशोध केली, परंतु उपयोग झाला नाही.
याबाबत सरला गणेश पटेल यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कचरे करीत आहे. दरम्यान, सध्या लग्न सराई असल्यामुळे बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे भुरट्या चोरांचे फावले आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.