529 सदस्यपदाच्या जागांसाठी दीड हजार उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 12:10 PM2021-01-05T12:10:15+5:302021-01-05T12:10:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ८७ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून माघारीच्या अंतिम दिवशी ६६५ सदस्यपदापैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील ८७ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातून माघारीच्या अंतिम दिवशी ६६५ सदस्यपदापैकी १३६ ग्रामपंचायती सदस्यपदे बिनविरोध झाल्याने ५३९ सदस्यपदाच्या जागांसाठी १ हजार ४२९ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात अंतिम मुदतीअंती एकूण २ हजार ५६ उमेदवारी अर्ज दाखल नंतर एकूण ४५ अर्ज अवैध ठरले होते. वैध अर्ज माघारी घेण्याची मुदत ही सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. एकूण १९४ जणांनी अर्ज माघारी घेतले. शहादा तालुक्यातील एकूण ६४८ पैकी १९९ जणांनी माघार घेतल्याने त्याठिकाणी ४४९ जण निवडणूक रिंगणात आहेत. नवापूर तालुक्यात १४ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने त्याठिकाणी एकूण २२९ उमेदवार रिंगणात आहेत. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ७९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तसेच चार प्रभाग बिनविरोध होवून ३३३ उमेदवार रिंगणात आले. तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी १३४ उमेदवार रिंंगणात आहेत.
शहादा व नंदुरबार तालुक्यांकडेच लागले संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
या ग्रामपंचायत निवडणूकीत शहादा तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, असलोद, शेल्टी व सारंगखेडा या मोठ्या गावांमध्ये निवडणूक होत आहे. सोबत नंदुरबार तालुक्यातील भालेर आणि कोपर्ली या दोन मोठ्या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये मतदान प्रक्रिया होणार असे स्पष्ट झाले असून याठिकाणी प्रचार सुरु झाला आहे.
सारंगखेडा ग्रामपंचायतीची निवडणूक ठरणार लक्ष्यवेधी
चेतक महोत्सव व एकमुखी दत्त मंदिरासाठी संपूर्ण देशात ओळखल्या जाणा-या सारंगखेडा ता. शहादा ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागात १७ सदस्यपदाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. रिंगणात ३६ उमेदवार आहेत. यापैकी कोण विजयी होणार याचे आडाखे बांधले जात आहे. ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चित ग्रामपंचायत आहे.
पुरूष व महिलांचे प्रमाण सारखेच
निवडणूक लढवणा-या १ हजार ५०४ उमेदवारांपैकी आरक्षित जागा तसेच अनारक्षित जागांवर पुरूष आणि महिलांचे प्रमाण समसमान असल्याचे समाेर आले आहे. २२ ग्रामपंचायती व काही प्रभाग बिनविरोध झाल्याने हा समतोल झाल्याचे दिसून आले आहे. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये पुरूष उमेदवारांची संख्या अधिक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती ६४
एकूण प्रभागाची संख्या २००
उमेदवार निवडणूक रिंगणात १४२९
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यक्रम सुरु आहे. माघारीनंतर उमेदवार आणि किती प्रभागात मतदान होईल हे स्पष्ट झाले आहे. काही गावे बिनविरोध झाली आहेत. यामुळे मतदान यंत्रे कमी लागून प्रशासनावरचा ताणही कमी होणार आहे. बिनविरोध निवडणूकांमुळे गावागावातील राजकीय संघर्षही मिटला आहे.
-बालाजी क्षीरसागर, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नंदुरबार.